Tue, Apr 23, 2019 19:42होमपेज › Belgaon › वर्षभरात निखळला कठडा; बुजल्या गटारी

वर्षभरात निखळला कठडा; बुजल्या गटारी

Published On: Feb 28 2018 1:18AM | Last Updated: Feb 27 2018 9:14PMबेळगाव : प्रतिनिधी

वर्षभरापूर्वी टिळकवाडीतील लेले मैदानाच्या विकासासाठी मनपाकडून चारी बाजूने लोखंडी कुंपण घालण्यात आले. ते करताना जेसीबीच्या साहाय्याने खोदाई करण्यात आल्याने गटारी व बसण्यासाठी बांधलेला कठडा निकामी झाला आहे. याकडे महापालिकेने लक्ष देण्याची मागणी रहिवासी करतात. लेले मैदानावर महापौर चषक हॉकी, फुटबॉल स्पर्धा पार पडल्या. टिळकवाडी भागातील खेळाडू या मैदानावर नेहमीच खेळायला येतात. यासाठी मैदानाच्या विकासाकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. मैदानाच्या विकासाचा विचार करून नगरसेवक पंढरी परब यांनी आपल्या फंडातून मैदानाच्या चारी बाजूने लोखंडी कुंपण करून घेतले होते.

मात्र ते करताना जेसीबीचा वापर केल्याने बाहेरील बाजूला असलेल्या गटारीची दुरवस्था झाली. बसण्यासाठी बांधण्यात आलेला कठड्याला भेगा पडल्या आहेत. मैदानाच्या बाजूच्या गटारी निकामी झाल्याने पावसाळ्यात मोठी समस्या निर्माण होणार आहे. त्याचा त्रास बाजूला असलेल्या रहिवाशांनाही सहन करावा लागणार आहे. पावसाळ्याला अवघे तीन महिने शिल्लक आहेत. त्यासाठी पावसाआधी गटारी व बसण्यासाठीचा कठडा बांधून देण्याची मागणी केली जात आहे. 

पावसाआधी मैदानाच्या बाजूच्या गटारी व कठडा बांधण्यात येणार आहे. यासाठी निविदा मागविल्या आहेत. कामाला लवकरच सुरुवात करण्यात येईल. मैदानाच्या विकासासाठी रेन हार्वेस्टिंग प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे. 

-पंढरी परब, नगरसेवक

मैदानाला लोखंडी कुंपण घालताना बाजूचा कठडा व फरशा निखळल्या आहेत. यामुळे पावसाळ्यात अडथळे येणार आहेत. महापालिकेने लक्ष देऊन त्वरित विकास करण्याची गरज आहे. 

-संतोष दरेकर, समाजसेवक