Sat, Jun 06, 2020 13:34होमपेज › Belgaon › राज्यात तिन्ही राजकीय पक्षांत सत्तेसाठी धडपड

राज्यात तिन्ही राजकीय पक्षांत सत्तेसाठी धडपड

Published On: Jan 05 2018 1:05AM | Last Updated: Jan 04 2018 8:53PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका एप्रिल किंवा मे 2018 मध्ये होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत एकूण 224 जागांपैकी भाजपने 150 जागा जिंकून आणून कर्नाटक काँग्रेस मुक्त करण्याचा निर्धार केला आहे. परंतु राज्यातील मतदारांचा व नागरिकांचा कानोसा घेतला तर राज्यात एकाच पक्षाचे सरकार येणे कठीण आहे.

सत्ताधारी काँग्रेसने गेल्या चार-पाच वर्षाच्या कालावधीत लोककल्याणकारी योजना राबविल्यामुळे काँग्रेसच पुन्हा सत्तेवर येणार असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जी. परमेश्‍वर छातीठोकपणे सांगत आहेत. निजदचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी विकास संकल्प यात्रा हाती घेऊन आपल्या पक्षाचीच सत्ता कर्नाटकात आणणार असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे राज्यात दोन राजकीय पक्षांचे संयुक्त सरकार सत्तेवर येण्याची शक्यता आहे. 

भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बी. एस. येडियुराप्पा हे भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शी सरकार देण्यास अपयशी ठरल्याचे त्यांच्या मागील मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीवरून स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्रिपदावर असताना त्यांना बेकायदा खनिज वाहतूक व बेकायदा डिनोटिफिकेशन केल्याच्या आरोपाखाली कारागृहात जावे लागले होते. अद्यापही त्यांच्यावर तो ठपका आहे. त्याशिवाय ते भाजपमध्ये हुकूमशहासारखे वागतात असा आरोप त्यांच्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते के. एस. ईश्‍वरप्पा यांच्यासहीत काही नेते करतात. त्याशिवाय भाजपने लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याच्या मागणीला विरोध केला आहे. 

काँग्रेसने लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्यात यावा, या मागणीला पाठिंबा व्यक्‍त करून त्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्याची ग्वाही दिली आहे. या मुद्यावरून निवडणुकीत भाजपपेक्षा काँग्रेसला लिंगायत समाजाचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. त्याशिवाय कर्नाटकात अल्पसंख्याक व अनुसूचित जाती जमातींसाठी काँग्रेसने अनेक योजना राबविल्या आहेत.

माजी पंतप्रधान व निजदचे सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांचा प्रभावही कर्नाटकाच्या राजकारणावर व राज्यातील वक्‍कलिग समाजावर आहे. त्यामुळे दक्षिण व उत्तर कर्नाटकातून ते व त्यांचे पुत्र माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी हे किमान 40 ते 45 जागा निवडून आणतील, असा विश्‍वास आहे. कुमारस्वामीही मुख्यमंत्री असताना भ्रष्टाचारमुक्त प्रशासन येण्यामध्ये अपयशी ठरले. खनिजप्रकरणी काही कंपन्यांना त्यांनी बेकायदा परवाने दिल्याचा खटला त्यांच्यावर आहे. त्याशिवाय खाण सम्राटांकडून 250 कोटीची लाच घेतल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे.