Mon, Jun 24, 2019 21:17होमपेज › Belgaon › थ्री फेज वीजपुरवठा सुरळीत करा

थ्री फेज वीजपुरवठा सुरळीत करा

Published On: Dec 15 2017 2:43AM | Last Updated: Dec 15 2017 1:02AM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

तालुक्यात सुरु असलेला थ्री फेज वीजपुरवठा शेतकर्‍यांसाठी योग्य नाही. सध्या सकाळी 9 ते दुपारी 1.30 पर्यंत वीजपुरवठा सुरु असून यावेळेत पिकांना पाणी देण्यासाठी अडचणी येत आहेत. यासाठी वीजपुरवठा सुरळीत व वेळेत बदल करून सहकार्य करावे, अशा मागणीचे निवेदन तालुका म. ए. समितीच्या शिष्टमंडळाने ‘हेस्कॉम’चे सहाय्यक कार्यकारी अभियंता विनोद केरूर यांना गुरुवारी सादर केले. 
बेळगाव तालुक्यात रब्बी हंगामाला सुरुवात झाली असून बटाटे, मिरची व भाजीपाल्याचे उत्पादन  मोठ्या प्रमाणात घेतले जाते. नदी आणि विहिरीच्या पाण्यावर शेतकरी हे उत्पादन घेतात. हंगामाला सुरुवात झाल्यामुळे शेतकरी लागवडीच्या कामात गुंतले आहेत. सध्या सकाळी 9 ते दुपारी 1.30 असा थ्री फेज वीजपुरवठा आहे. या वेळेत शेतकर्‍यांना बटाटा लागवडीसाठी अडचण येत आहे. बटाटे लागवडीनंतर दोन ते तीन तासांनी वीजपुरवठा करणे अपेक्षित आहे. पण, वीज नसल्यामुळे दुसर्‍या दिवशी पाणीपुरवठा करावा लागत आहे. यासाठी वेळापत्रकात तातडीने बदल करावा, असे निवेदनात नमूद केले आहे. 

‘हेस्कॉम’चे अधिकारी केरुर निवेदन स्वीकारून म्हणाले, शेतकर्‍यांना येणार्‍या अडचणी लक्षात घेऊन यावर तातडीने उपाययोजना आखण्यात येतील. आठ दिवसांतून एकदा वेळापत्रकात बदल करण्यात येणार असून तीन टप्प्यांत थ्री फेज वीज देण्यात येणार आहे. जेणेकरून शेतकर्‍यांना याचा लाभ होईल. पहिल्या टप्प्यात सकाळी 6 ते 10.30, दुसर्‍या टप्प्यात 10.30 ते 3 आणि तिसर्‍या टप्प्यात 3 ते 7.30 असे थ्री फेज वीजपुरवठ्याचे टप्पे ठेवण्यात येतील. येत्या 4 दिवसांपासून याची अंमलबजावणी केली जाईल.

कूपनलिकेसाठी 4.50 लाख रुपयांची सौरऊर्जा योजना असून यात 3.50 लाख रुपये सबसिडी असणार आहे. शेतकर्‍यांना फक्‍त 1 लाख रुपये भरावे लागणार आहेत. प्रत्येक शेतकर्‍याने याचा लाभ घ्यावा. धामणे येथील बाबू खणाजी यांचा काही दिवसांपूर्वी विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये नुकसानभरपाई मंजूर झाली होती. ती आता 5 लाख रुपये केली असल्याची माहितीही केरुर यांनी दिली. 

यावेळी माजी आ. मनोहर किणेकर, तालुका म. ए. समिती अध्यक्ष निंगोजी हुद्दार, जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, दत्ता उघाडे, आर. आय. पाटील, राजू किणयेकर, विष्णू गावडा, रामा आमरोळकर, परशराम आमरोळकर, कल्लाप्पा चव्हाण, मदन भडांगे, मारुती शिंदे, महेश पाऊसकर, विलास गावडा, मनोज हलगेकर, पवन जाधव, दौलत यळ्ळूरकर, अरुण गुरव, सुभाष शिंदे आदी शेतकरी उपस्थित होते.