Fri, May 24, 2019 16:30होमपेज › Belgaon › एपीएमसीत दुसर्‍या दिवशी तीन कोटींची उलाढाल

एपीएमसीत दुसर्‍या दिवशी तीन कोटींची उलाढाल

Published On: May 16 2019 2:04AM | Last Updated: May 16 2019 2:04AM
बेळगाव : प्रतिनिधी

कृषी उत्पन्न बाजार समितीत (एपीएमसी) बुधवारी सुमारे तीन कोटींची उलाढाल झाली. बुधवारी दिवसभरात 612 चारचाकी व 659 दुचाकींवरून भाजीपाला घेऊन शेतकरी आले होते.  दुसर्‍या दिवशीही एपीएमसीच्या गेटवर पोलिस तैनात करण्यात आले होते. बाजारात खरेदी-विक्रीचे सौदे सुरू होते. भाजीपाला घेऊन जाण्यासाठी विक्रेत्यांनी गर्दी केली होती. शेतकरी व विक्रेत्यांच्या गर्दीमुळे एपीएमसी परिसर गजबजून गेला होता. 

नूतन भाजी मार्केटमध्ये  दोडका, टोमॅटो, कारली, बॅडगी  मिरची, मुळा, फ्लॉवर, कोबी, कोथिंबीर, पालक, मेथी, लालभाजी, काकडी, कांदा पात, शेपू, शेवगा, लिंबू आदी भाजीपाला घेऊन शेतकरी आले होते. बाजारात पहिल्या दिवशी 1 कोटीची उलाढाल झाली होती. 

सकाळच्या टप्प्यात भाजीपाल्याला मागणी अधिक असते. परगावच्या ठिकाणी भाजीपाला निर्यात करण्यासाठी सकाळच्या वेळी भाजीपाला खरेदी केला जातो. कोकण, गोवा आदी ठिकाणी भाजी पाठविली   जाते. संध्याकाळीही भाजी मार्केटमध्ये शेतकर्‍यांनी भाजीपाला विकण्यासाठी गर्दी केली होती.

एपीएमसी आवारात जागा भरपूर असल्याने वाहनधारकांना पार्किंगची समस्या येत नाही.  भाजी मार्केटचे स्थलांतर झाल्याने किल्ला परिसरात  वाहतूक कोंडी कमी झाली आहे. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी कमी झाली आहे.  

भाजीपाल्याला मागणी वाढली
लग्नसराई, यात्रा आदींमुळे भाजीपाल्याला मागणी वाढली आहे.       काही  भागातील भाजीपाला पाण्याच्या टंचाईमुळे खराब झाला आहे. कोथिंबीर 1000 ते 1500 रूपये शंभर पेंढी, टोमॅटो 250 ते 300 रूपये दहा किलो, काकडी 120 ते 150 रूपये आहे. अन्य भाजीपाल्यालाही मागणी वाढली 
आहे.