Fri, Jul 19, 2019 19:50होमपेज › Belgaon › कर्नाटक : काँग्रेसची 'एकहाती' सत्ता अशक्य?

कर्नाटक : काँग्रेसची 'एकहाती' सत्ता अशक्य?

Published On: Mar 15 2018 1:17AM | Last Updated: Mar 15 2018 2:30PMबंगळूर : प्रतिनिधी

राज्यात पुन्हा स्वबळावर सत्तेत येण्याच्या काँग्रेसच्या अंदाजावर नुकत्याच आलेल्या पाहणी अहवालामुळे प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.आतापर्यंत झालेले सर्वेक्षण आणि नुकताच हाती आलेला पाहणी अहवाल यामध्ये काँग्रेसला 15 जागा गमवाव्या लागणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.यापूर्वी मुख्यमंत्री सिध्दरामय्या, केपीसीसी आणि पक्षश्रेष्ठींनी सहा स्वतंत्र सर्वेक्षण मोहीम हाती घेतल्या होत्या. यामध्ये काँग्रेस पुन्हा स्वबळावर सत्तेत येईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता पण नुकत्याच हाती आलेल्या पाहणी अहवालामध्ये काँग्रेसला किमान 15 जागा गमवाव्या लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानसभेत सध्या काँग्रेसचे पक्षीय बलाबल 122 आहे. त्यामध्ये 15 जागा कमी झाल्यास पक्षाकडे 100 ते 105 संख्याबळ असेल त्यामुळे सरकार स्थापनेसाठी दुसर्‍या पक्षांवर अवलंबून रहावे लागणार असल्याचे पाहणी अहवालात म्हटले आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पक्षश्रेष्ठींकडे हा अहवाल सुपूर्द करण्यात आला आहे.

पिछाडीची संभाव्य कारणेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राज्य दौरा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची बूथ पातळीवरील रणनीती, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भाषणे यामुळे राज्यातील काँग्रेसचे संख्याबळ कमी होणार असल्याचे अहवालात म्हटले आहे.पक्षातील अंतर्गत कलह, नेत्यांमधील दुही, पक्षनेत्यांची परस्परविरोधी वक्‍तव्ये, विविध आरोप असलेले आनंद सिंग, नागेंद्र आणि अशोक खेणी यांना पक्षात सामावून घेणे, अनुसूचित जाती-जमाती फेरवर्गीकरणाबाबत दुहेरी भूमिका, लिंगायत धर्म दर्जा, सरकारच्या योजनांचा व्यापक प्रचार न होणे, सरकारविरुध्द भाजपचा सातत्याने हल्लाबोल, कोणालाही विश्‍वासात न घेण्याचा मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांचा स्वभाव आदी कारणांचाही संख्याबळ घटण्यात वाटा असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

यापूर्वी मोठा पाठिंबा असलेला अहिंद (अल्पसंख्याक, मागावर्गीय आणि दलित) वर्ग आपला हात सोडेल, अशी भीती सिध्दरामय्या यांनी व्यक्त केली आहे. पक्षाने यापुढे कोणती काळजी घ्यावी हेदेखील अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.भाजपने बंगळूर आणि किनारपट्टी भागात अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. तेथे काँग्रेसनेही जादा लक्ष देणे गरजेचे आहे. गेल्यावेळी चांगली कामगिरी झालेल्या जिल्ह्यात कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्ष करू नये, राहुल गांधी यांच्या सभांना आणि रोड शोमध्ये सहभागी जमावाचे मतामध्ये परिवर्तन करण्यासाठी प्रयत्न हाती घेणे आवश्यक असल्याचे अहवालात म्हटले आहे.
विशेष बस यात्रासाधना संभ्रम, पराभूत मतदारसंघातील रॅली आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखालील जनाशीर्वाद यात्रा यामध्ये समाविष्ट न झालेल्या तालुका केंद्रात आता काँग्रेसची ‘एकता बस’ प्रवास करणार आहे. राज्यातील पक्षाचे सर्व नेते एकाच बसमध्ये बसून रॅली घेण्याची सूचना पक्षश्रेष्ठींनी केली आहे.

त्यानुसार पक्षाचे राज्य प्रभारी के. सी. वेणूगोपाल, प्रदेशाध्यक्ष जी. परमेश्‍वर, प्रचार समिती अध्यक्ष डी. के. शिवकुमार, कार्याध्यक्ष दिनेश गुंडूराव हे या बसयात्रेबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत. राहुल गांधी यांच्या जनाशीर्वाद यात्रेचा तिसरा टप्पा दि. 20 व 21 मार्च आणि 24 व 25 मार्च रोजी होणार आहे. त्यानंतर ही बस यात्रा सुरू होणार आहे.