Sat, Apr 20, 2019 15:52होमपेज › Belgaon › टिळकवाडीत दोन दुकानांमध्ये चोरी 

टिळकवाडीत दोन दुकानांमध्ये चोरी 

Published On: Dec 21 2017 1:54AM | Last Updated: Dec 21 2017 12:25AM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

शहरामध्ये गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असून, नागरिकांत भीती व चिंतेचे वातावरण पसरले आहे. मंगळवारी रात्री खानापूर रोड टिळकवाडी येथील हायर फॉक्स या सायकल दुकानात व कबाडी वाईन्समध्ये चोरी झाली आहे. बुधवारी सकाळी चोरीचा प्रकार निदर्शनास आला. दोन्ही दुकानांतील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांमध्ये चोरट्यांच्या हालचाली चित्रित झाल्या आहेत. 

हायर फॉक्स सायकल दुकान व कबाडी वाईन्समधील मागच्या बाजूचे शटर तोडून चोरट्यांनी आत प्रवेश मिळविला. सायकल दुकानातील एक किमती कॅमेरा, 8 हजार रु. व अन्य काही महागड्या वस्तू, तसेच दोन रिमोटवर चालणार्‍या बेबीगाड्या लंपास केल्या आहेत. कबाडी वाईन्समधून 8 हजारांची रोकड, 17 हजारांहून अधिक किमतीच्या दारूच्या बाटल्या चोरट्यांनी लंपास केल्या. दुकानातील तीन दारूच्या बाटल्या चोरट्यांनी दुकानातच रिचविल्या आहेत. हायर फॉक्सचे मालक विपीन शहा व कबाडी वाईन्सचे मालक कबाडी यांनी टिळकवाडी पोलिसांत फिर्याद दिल्यावरून पोलिसांनी ठसेतज्ज्ञ व श्‍वानपथकाच्या सोबतीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झालेल्या चोरट्यांच्या छबीवरून चोरट्यांनी तोंडावर हातरूमाल बांधला होता. मंगळवारी रात्री 1 च्या सुमारास चोरीचा प्रकार घडल्याची माहिती मिळाली आहे. टिळकवाडी पोलिसांनी पुढील तपास चालविला आहे.