Sun, Mar 24, 2019 08:34होमपेज › Belgaon › निपाणीला तालुक्याचा दर्जा; जनरेट्याचा विजय

निपाणीला तालुक्याचा दर्जा; जनरेट्याचा विजय

Published On: Jan 03 2018 1:10AM | Last Updated: Jan 03 2018 12:54AM

बुकमार्क करा
निपाणी : प्रतिनिधी

गेले आठ दिवस निपाणी तालुक्याबाबतची संभ्रमित अवस्था दूर झाली असून, निपाणीला तालुक्याचा दर्जा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तशी अधिसूचना मंगळवारी निघाली आहे. त्यामुळे निपाणीला तालुक्याचा दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने 55 गावातील नागरिकांचे स्वप्न साकार झाले.

12 डिसेंबर रोजी राज्याच्या महसूल विभागाचे उपसचिव कॅप्टन डॉ. के. राजेंद्र यांनी काढलेल्या अधिसूचनेमध्ये निपाणी तालुक्याचे नाव नव्हते. त्याचे तीव्र पडसाद निपाणीत उमटले. मूकमोर्चाद्वारे निपाणीकरांनी नाराजी व्यक्‍त केली. त्यामुळे पालकमंत्री रमेश जारकिहोळी, जिल्हाधिकारी एस. झियाऊल्ला, निवासी जिल्हाधिकारी सुरेश इटनाळ, तहसीलदार चिदंबर कुलकर्णी यांच्या तालुका निर्मिती समितीने तत्काळ तांत्रिक बाबी पूर्ण करून निपाणी तालुका निर्मिती शिफारस फाईल बंगळूरला पाठविली होती. त्यानुसार सरकारने जनरेट्यापुढे नमून निपाणीला तालुक्याचा दर्जा देण्याची घोषणा केली आहे. अधिसूचनेबाबत प्रा. डॉ. अच्युत माने यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

निपाणीकरांच्या रक्‍तातच चळवळ आहे. त्यांनी आंदोलन करताच तत्काळ दखल सरकारने घेतली, असे माजी आ. सुभाष जोशी यांनी सांगितले. त्यामुळे आज दि. 3 पासून होणारे आंदोलन स्थगित करण्यात आले.

निपाणी नगरपालिकेत बोलाविण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीत ते बोलत होते. प्रा.जोशी म्हणाले, निपाणी तालुक्यामध्ये चिकोडी व हुक्केरी तालुक्यातील गावांचा समावेश करण्यात आला होता. त्यास तेथील लोकप्रतिनिधींनी विरोध केल्याचे निपाणी तालुक्याची घोषणा प्रलंबित राहिली होती. नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर म्हणाले, जनतेने रस्त्यावर येऊन केलेल्या आंदोलनाची सरकारने दखल घेतली. निपाणी सब रजिस्ट्रार कार्यालयात येणारी गावे तालुक्यात येण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेऊ. लक्ष्मणराव चिंगळे, जुबेर बागवान, कबीर वराळे यांनीही मनोगत व्यक्‍त केले. सभापती नजहतपरवीन मुजावर, टाऊन प्लॅनिंग कमिटी अध्यक्ष बाळासाहेब देसाई सरकार, नगरसेवक संजय सांगावकर, राजेंद्र चव्हाण, रवींद्र शिंदे, नीता लाटकर, दिलीप पठाडे, रवी चंद्रकुडे, धनाजी निर्मळे, किरण कोकरे, शिरीष कमते आदी उपस्थित होते.

तर डॉ. माने यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत जि.पं.सदस्य सिद्धू नराटे, नगरसेवक राज पठाण, दत्ता जोत्रे, शौकत जमादार, हालशुगर संचालक एम.पी.पाटील यांनीही मनोगत व्यक्‍त केले. नगरसेवक प्रवीण भाटले, दीपक माने, समित सासणे, जयवंत भाटले, बंडा घोरपडे आदी उपस्थित होते.