Sun, Jul 21, 2019 01:25होमपेज › Belgaon › फुलू दे रंगभूमीचा फुलोरा...

फुलू दे रंगभूमीचा फुलोरा...

Published On: Mar 05 2018 9:21PM | Last Updated: Mar 05 2018 9:20PMबेळगाव : श्रीकांत काकतीकर

बेळगाव हे नाट्यवेड्या रसिकांचे शहर आहे. अण्णासाहेब किर्लोस्करांनी बेळगावात सुरू केेलेल्या नाट्यपरंपरेला पुढे नेण्याचे काम अनेक ध्येयवेड्या नाट्यकर्मींनी केले आहे. बेळगावातील नाट्यकर्मींच्या प्रयत्नांमुळे आजही नव्या पिढीला मराठी रंगभूमीची ओळख आहे. बेळगावात होतकरू आणि गुणवान युवा कलाकारांची वानवा नाही. मात्र, प्रतिभावन युवा कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम होणे आवश्यक आहे. निवडणुकीचे नाट्य पार पडले आहे. आता तरी अ.भा.नाट्य परिषद बेळगाव शाखेने नव्या जोमाने काम करावे, अशी अपेक्षा व्यक्‍त होत आहे.

अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी बेळगावात नाट्यसृष्टीचा पाया रोवण्याचे काम केले. त्यानंतर अनेकांनी विविध रूपात बेळगावच्या नाट्यसृष्टीला बहरविण्याचे काम केले. यामध्ये बेळगावातील अनेक नाट्यसंस्थांचेही योगदान मोठे आहे. 1940 च्या सुमारास दादासाहेब गळतगेकर—नाईक यांनी मित्रमंडळ संस्था सुरू केली. मित्रमंडळाद्वारे दादासाहेबांनी अनेकांना नाट्यसृष्टीचे धडे दिले. 1945 साली वाङ्मय चर्चा मंडळाच्या नाट्य शाखेचाही प्रारंभ झाला. वाङ्मय चर्चा मंडळाच्या नाट्यशाखेने भव्य स्वरूपात नाट्य महोत्सवाचे आयोजनही केले. या नाट्य शाखेच्या प्रयत्नातून संगीत सौभद्र, संगीत संशय कल्‍लोळ, हाच मुलाचा बाप आदी नाटकांनी राष्ट्रीय स्तरावरील दिल्‍ली येथील नाट्य स्पर्धेत मोठे यश मिळवून दिले. 

1952 साली गो. म. वाटवे यांनी कलोपासना संस्थेची स्थापना केली. कलोपासनाच्यावतीने 1956 साली नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. आचार्य अत्रे यांनी कलोपासनाच्या कलाकारांची मुक्‍तकंठाने स्तुती केली होती.

नेहरू जयंती कार्यक्रमातून नेहरू मंडळाची स्थापना झाली. याच मंडळातून कै. दौलत मुतकेकर यांनी आपल्या अभिनयाला सुरूवात केली. कै. पुंडलिक कुलकर्णी यांनी कलाविकास मंडळाची स्थापना केली. कलाविकास मंडळाच्यावतीने शहरातील गुणवान, नवोदित कलाकारांसाठी सातत्याने व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे उपक्रम राबविले जात असत. ओरसा या  नाट्य समूहाच्या माध्यमातून अरविंद याळगी यांनी अनेक नाटकांचे प्रयोग केले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विशेष नाट्य विषयक उपक्रम राबविले जात असत. 

एका बाजूला तरूण नवोदित गुणवान कलाकारांसाठी विविध संस्था नाट्यविषयक उपक्रम राबवित असताना दुसर्‍या बाजूला नाट्य परिषदेच्या बेळगाव शाखेच्या अध्यक्षा वीणा लोकूर यांनी लहान मुलांसाठी फुलोरा या संस्थेची स्थापना केली. फुलोराच्या माध्यमातून लोकूर यांनी नाट्य शिबिरांचेही आयोजन केले. नाट्य चळवळीतून लोकूर यांना चित्रपट सृष्टीत पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्यांनी मुलांच्या जीवनावर आधारित मिशन चॅम्पियन तसेच युवा मनावर आधारित प्लॅटफार्म या चित्रपटांची निर्मिती केली.

वरेरकर नाट्यसंघाने गुणी कलाकार दिले

बेळगावच्या नाट्यक्षेत्रात मामा वरेरकर यांचे महत्व आगळे आहे. वरेरकर नाट्य संघाने बेळगावच्या नाट्यसृष्टीला अनेक गुणी कलाकार दिले. या संघातूनच बाप्पा शिरवईकरांसारखा कुशल दिग्दर्शक मिळाला. याच संघातून अ‍ॅड. दौलत मुतकेकर, श्रीरंग मराठे, शशिताई भानप, विमल प्रभूदेसाई, आशा रतनजी, विष्णूपंत कुलकर्णी, तिळगंजी, लाड  भगिनी, हिरा गिंडे, मीरा देशपांडे, शकुंतला याळगी, डॉ. इंदिरा जोशी, अरविंद याळगी, विठ्ठल याळगी, शंकर बाचुळकर, अजित इंगळे, डॉ. अशोक साठे, सिंधू कुलकर्णी, अरवंदेकर मास्तर, प्रसाद पंडित, वृषाली मराठे यासारखे नाट्यकर्मी निर्माण झाले.