Tue, Jan 22, 2019 22:08होमपेज › Belgaon › पर्यटन बेतू नये जीवावर, यासाठी...

पर्यटन बेतू नये जीवावर, यासाठी...

Published On: Jul 14 2018 12:55AM | Last Updated: Jul 13 2018 8:28PMबेळगाव : प्रतिनिधी

पंधरा दिवसांपासून दमधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे वर्षा पर्यटनाला जाणार्‍यांची संख्या वाढली आहे. मात्र, या काळात दारुच्या नशेत सेल्फीच्या धुंदीत अनेक पर्यटक आपला जीव गमावतात. छोट्या-छोट्या चुकींमधून अनेकांचा बळी गेल्याच्या घटना मागील काही वर्षात घडल्या आहेत.

गेल्या रविवारी 8 जुलै रोजी तिलारी घाटात पडून पाच बेळगावकरांना आपला जीव गमवावा लागला होता. घाटात धुके पसरले होते. यामुळे अपघाताला निमंत्रण मिळाले. अशा वेळी गाडी थांबविणेच फायदेशीर ठरते. तसेच पंधरा दिवसांपूर्वी गोकाक धबधब्यात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे पर्यटनस्थळावर अतिधाडस टाळण्याची गरज आहे. पर्यटन स्थळावर पर्यटकांना दारु बंदी नाही. यामुळे अपघाताला आमंत्रण मिळते. पोलिसांनीही त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच पर्यटनस्थळी नशा करून हुल्लडबाजी करणार्‍या पर्यटकांवरही कडक कारवाई करणे गरजेचे आहे. समुद्रकिनारी खोल पाण्यात जाणे टाळावे तसेच समुद्राच जात असाल तर तेथील स्थानिक हवामानाची आधी माहिती घ्यावी. भरती ओहोटीची स्थानिकांकडून वेळ माहिती करून घ्यावी. बेळगाव जिल्ह्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत. पर्यटन स्थळावर जाणार्‍यांची संख्याही पावसाथ वाढते. विशेषतः शनिवारी आणि रविवारी वर्षा पर्यटनासाठी जाणार्‍यांची संख्या अधिक असते. रहदारीचा अडथळा, वाहनांचा अतिवेग यामुळे अपघात होऊन जीव गमावणार्‍यांची संख्या वाढते आहे. यामुळे रविवार अपघातवार ठरतो आहे.  

पर्यटन स्थळे 

बेळगाव जिल्ह्यासह परिसरात गोकाक धबधबा, गोडचीनमलकी, हिलकल डॅम, राकसकोप, आंबोली, नांगरतास, भुतनाथ देवस्थान, जांबोटी वाडा, सडा, हबनहट्टी, चोरला, सुरल, चिगुळे, पारवाड, आसोगा, सुंडीचा धबधबा, नवीलतीर्थ डॅम, स्वप्नवेल आदी ठिकाणी पर्यंटन स्थळे आहे. बहुतांशी पर्यटन स्थळावर प्रशासनाकडूनही सुरक्षेचे फलक लावण्यात आले नाहीत. यामुळे फलक लावण्याची मागणीही होत आहे. 

अशी घ्यावी काळजी 

फिरायला जाताना एकटे जाणे टाळा.
धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नका.
नियमांचे पालन करावे. 
पर्यटकांनी खोल पाण्यात, डोंगराच्या कडेला जाणे टाळावे.
संबंधित ठिकाणच्या बचाव यंत्रणेचा संपर्क क्रमांक स्वतःजवळ ठेवावा