Wed, Nov 21, 2018 16:28होमपेज › Belgaon › मुंबईचा डॉन सुरेश मंचेकरचा बंगला बनलाय नशेचा ‘अड्डा’ 

मुंबईचा डॉन सुरेश मंचेकरचा बंगला बनलाय नशेचा ‘अड्डा’ 

Published On: Jul 26 2018 1:31AM | Last Updated: Jul 26 2018 12:20AMबेळगाव : प्रतिनिधी

ढासळलेल्या घराच्या विटादेखील लोक सोडत नाहीत, अशी म्हण आहे. मग भलेही तो डॉन का असेना! मुंबई-ठाण्याचा एकेकाळचा डॉन सुरेश मंचेकरचा भवानीनगर-बेळगावमधील बंगला याचे उदाहरण ठरावे. कधीकाळी वैभव अनुभवणारा हा बंगला आता नशेचा अड्डा बनला आहे, अनेक छोट्या गुन्हेगारीचे आश्रयस्थान बनला आहे.  बंगल्यात मद्यप्राशनाबरोबर गांजा, चरस ओढण्याचे प्रकार चालतात.  
तब्बल 30 गुन्ह्यांखाली पोलिसांना हवा असलेला मुंबईतील ठाण्याचा डॉन सुरेश मंचेकरचे वास्तव्य बेळगावातील भवानी नगरात स्वमालकीच्या बंगल्यात होते. मात्र  स्थानिक पोलिसांना त्याची पुसटशी कल्पना नव्हती. कारण मंचेकर नाव बदलणे, वेश बदलणे यामध्ये माहीर होता. 

वयाच्या 72 व्या वर्षी मंचेकरची आई लक्ष्मीबाई मंचेकर हिला महेंद्र खानविलकरच्या खुनाच्या आरोपात जन्मठेप झाली होती. सुरेशला पकडण्यासाठी कोल्हापूर व मुंबई पोलिसांनी शोधमोहीम आखली होती. 15 ऑगस्ट 2003 रोजी पोलिसाच्या एन्काऊंटरमध्ये तो मारला गेला. त्यावेळी त्याला याच बंगल्यातून पकडून नेण्यात आले होते. 

बेळगाव हे गुन्हेगारी क्षेत्रात वावरणार्‍यांसाठी सुरक्षित ठिकाण मानले जाते. भवानीनगरात सुरेश मंचेकर वेश बदलून राहत होता. शिवारात बंगला असल्याने तो सर्वसामान्यांसारखेच जीवन जगत असल्याने तो गुंड प्रवृतीचा होता, असे तेथील स्थानिक लोकांना वाटत नव्हते.  

मंचेकर पोलिस कारवाईत मारला गेल्यानंतर बेळगावात त्याचे वास्तव्य होते ते उघड झाले. पोलिसांनी केलेल्या कारवाईत महत्त्वाची कागदपत्रे मिळतात का, याचा शोध घेऊन बंगल्याला कुलूप लावले. त्यानंतर या बंगल्याचा वारस कोण याबद्दल कधी कोणीही पुढे आलेले नाही. त्यामुळे ही दोन इमारत बंद होती.  बंगल्यातील किमती फर्निचर, सागवानचे दरवाजे, फरशादेखील लोकांनी लांबविल्या 
आहेत. 

मंचेकरचा बंगला शहरापासून पाच कि. मी.वर आहे. भवानी नगर मंडोळी रोड येथे नागरिकांची वर्दळ कमी असते. या बंगल्यात पाहणी केली असता बंगल्यात दारुच्या बाटल्याचा खच पडल्याचे निदर्शनास आले. गांजा, चरस, सिगारेट, गुटख्याची पाकिटे मोठ्या प्रमाणात पडली आहेत. भिंतीवर घाणेरडा मजकूर लिहिला असून कंडोमची पाकिटेदेखील आढळून आली आहेत.