Fri, Mar 22, 2019 01:38
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › क्षुल्लक भांडण ठरले आत्महत्येला कारणीभूत

क्षुल्लक भांडण ठरले आत्महत्येला कारणीभूत

Published On: Jan 21 2018 2:44AM | Last Updated: Jan 20 2018 11:54PMबेळगाव : प्रतिनिधी

क्षुल्‍लक कारणावरून झालेल्या भांडणामुळे दांपत्याचा बळी गेल्याची घटना अलतगा गावाजवळ घडली. बागलकोटहून बेळगावला रोजीरोटीसाठी आलेल्या अंजली रवि राठोड (वय 22) व रवि राठोड (वय 25) या दोघांचे क्षुल्लक कारणावरून भांडण झाले. रागाच्या भरात अंजलीने गळफास घेतला. अंजलीच्या आत्महत्येने व्यथित झालेल्या रविनेही काही वेळातच आत्महत्या केली.  

अंजली आणि रवि हे दोघे विजापूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यातील आहेत. त्या दोघांनी अलिकडेच प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर ते दोघे  महिन्यापूर्वी बेळगावला आले. अलतगा येथील अमित पाटील यांच्या काजू फॅक्टरीत कामाला लागले.    संसाराला हातभार लावण्यासाठी दोघेही कष्ट करू लागले. संसाराचा गाडा हाकताना रवि आणि अंजलीत खटके उडू लागले. क्षुल्लक भांडण विकोपाला जाऊ लागले आणि यातूनच गुरुवारी रात्री झालेल्या क्षुल्लक कारणाच्या वादातून अंजलीने फॅक्टरीजवळील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

अंजलीबरोबर झालेल्या वादानंतर रवि घराबाहेर गेला होता. काही वेळानंतर तो घरी परतला. त्यावेळी घराचा दरवाजा बंद दिसून आला.  रविने अर्धा तास घराबाहेर बसून काढला. त्यानंतर त्याने अंजलीचा मागोवा घेण्यासाठी घराच्या खिडकीतून आत पाहिले आणि आतील दृष्य पाहून रवि थरारून गेला. अंजलीने आत्महत्या केल्याचे पाहून भेदरलेल्या रविने घरापासून पळ काढला. सकाळी फॅक्टरीच्या मालकांना अंजलीने आत्महत्या केल्याचे माहिती मिळाली. त्यानंतर रविचा शोध घेण्यात आला. रविचा मोबाईलही स्वीचऑफ दिसून आला. अंजलीच्या आत्महत्येची माहिती काकती पोलिसांना कळविण्यात आली. 

पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.  दुपारी अंजलीचा मृतदेह शवागाराकडे पाठविण्यात आला. त्यानंतर फॅक्टरीजवळील काहींना नजीकच्या आंब्याच्या झाडाला रविने गळफास लावून घेतल्याची माहिती मिळाली.  

सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता घरापासून काही अंतरावर असलेल्या शेतातील झाडाला रवीने गळफास घेतल्याचे दिसून आले. अंजलीपाठोपाठ रविच्या आत्महत्येचा पंचनामा करण्यात आला. आयुष्यभर एकत्र राहण्यासाठी प्रेमविवाह केलेल्या अंजली आणि रवीची क्षुल्लक भांडणातून कायमची ताटातूट झाली. आणि दोघांचेही मृतदेह शवागारात एकत्र आले.  रविचे नातेवाईक शनिवारी सकाळी बेळगावात दाखल झाले. त्यानंतर पोलिस त्यांच्याकडे आत्महत्येच्या कारणाबाबत चौकशी करीत होते.