Sun, Oct 20, 2019 12:10होमपेज › Belgaon › उसाचा पाला बारीक करणार्‍या यंत्रासाठी साहाय्यधन

उसाचा पाला बारीक करणार्‍या यंत्रासाठी साहाय्यधन

Published On: Dec 02 2017 12:40AM | Last Updated: Dec 01 2017 8:51PM

बुकमार्क करा

चिकोडी : काशिनाथ सुळकुडे

राज्यात सर्वाधिक उसाचे उत्पादन होत असल्यामुळे साखरेचा जिल्हा म्हणून ओळखले जाणार्‍या बेळगाव जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना उसाचा पाला बारीक करण्याच्या यत्रांसाठी सहाय्यधन देण्यात येणार आहे. उसाचा न जाळता यंत्राव्दारे बारीक करुन मातीची सुपीकता, पोत राखण्यासाठी सरकार प्रायोगिक तत्वावर ही योजना आखली आहे.

ऊस तोडीनंतर कचरा बनून राहिलेला पाला पाचोळा जाळला जातो. यामुळे मातीची सुपीकता, पोत नष्ट होऊन पर्यावरणावर  परिणाम होतो. याला रोखण्यासाठी कृषी खात्याकडून उसाचा पाला बारीक करण्याचे यंत्र शेतकर्‍यांना सहाय्यधनात वितरण करण्यात येत आहे. कृषी यंत्रधारक केंद्रांकडून पाला बारीक करण्यासाठी शेतकर्‍यांना प्रती हेक्टरला 3 हजार रुपये दर आकारण्यात येत असून यातील 1500 रुपये सहाय्यधन शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे.

चिकोडी कृषी उपसंचालकांच्या कार्यक्षेत्र व्याप्तीत सुमारे 1.80 लाख हेक्टरमध्ये ऊस पीक घेण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ऊस तोडणीनंतर शिल्लक राहणारा पाला न जाळण्याचे अभियानाव्दारे सांगूनदेखील काही उपयोग झाला नाही. त्यामुळे सेंद्रिय खत तयार करण्याच्या अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. 

उसाचा पाला जाळल्यामुळे मातीतील सूक्ष्म जीवाणूंची प्रक्रिया थांबते. तसेच किटकांचा नाश, पाण्याच्या आवश्यकतेत वाढ,  खर्चात वाढ होत असल्याचे कृषी तज्ज्ञ सांगतात. पण पर्यावरणप्रेमी पध्दत वापरल्यामुळे मातीतील तापमान कमी होऊन सूक्ष्म जीवाणूंची वाढ होते. तसेच उसाचा उतारा वाढून  खर्चात घट होते तसेच पाण्याचा योग्य वापर होतो, हे ऊस उत्पादकांना सांगण्यात आले.