Wed, Mar 20, 2019 23:05होमपेज › Belgaon › सुधन्वा गोंधळेकर एसआयटीच्या ताब्यात

सुधन्वा गोंधळेकर एसआयटीच्या ताब्यात

Published On: Sep 08 2018 1:31AM | Last Updated: Sep 08 2018 1:31AMबंगळूर : प्रतिनिधी

डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी महाराष्ट्रातील दहशतवादविरोधी पथकाने अटक केलेल्या संशयित सुधन्वा गोंधळेकरला गौरी लंकेश हत्येप्रकरणी कर्नाटक विशेष तपास पथकाने (एसआयटी) ताब्यात घेतले आहे. त्याला चौदा दिवस कोठडी देण्यात आली आहे. एटीएसने सुधन्वाकडून काही पिस्तूल जप्‍त केल्या होत्या. त्याही ताब्यात घेण्यासाठी एसआयटी प्रयत्न करत आहे.

पुरोगामी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येतील सुधन्वा हा चौदावा संशयित आहे. हत्येसाठी त्याने पिस्तूल पुरविल्याचा संशय एसआयटीला आहे. गौरी हत्येतील संशयितांच्या तो संपर्कात होता, अशी माहितीही उघड झाली आहे. हत्येसाठी वापरण्यात आलेली पिस्तूल अजूनही सापडलेली नाही. 

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र एटीएसने मुंबईतील नालासोपारा येथे कारवाई करून वैभव राऊत या संशयिताला अटक केली. त्याच्याकडे काही पिस्तुले सापडली. वैभव हा गौरी लंकेश हत्येतील संशयितांच्या संपर्कात होता, अशी माहिती एसआयटीला मिळाली होती. यामुळे त्याच्याकडून जप्‍त करण्यात आलेल्या पिस्तुलांमध्ये गौरी यांची हत्या केलेल्या पिस्तुलाचा समावेश असण्याबाबत संशय आहे. संशयिताला ताब्यात घेतले तरी त्याच्याकडून जप्‍त केलेले पिस्तूल सीबीआयच्या ताब्यात आहे. यासाठी न्यायालयाची रीतसर परवानगी घ्यावी लागणार आहे. यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याची तयारी एसआयटी करत आहे. सीबीआयने तपास पूर्ण करून पुरावे न्यायालयाला सादर केल्यास पिस्तूल मिळविणे अवघड आहे. त्याआधीच पिस्तूल ताब्यात घेऊन बंगळुरातील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपास करण्याचे एसआयटीने ठरविले आहे. 

वैभव राऊतबरोबर आणखी एक संशयित सुधन्वा गोंधळेकरलाही महाराष्ट्र एटीएसने अटक केली आहे. गौरी हत्येत सुधन्वाचा हात असल्याचे काही पुरावे एसआयटीकडे असल्याने त्याला ताब्यात देण्याची मागणी एसआयटीने विशेष न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार सुधन्वाला चौदा दिवस एसआयटीच्या ताब्यात देण्यात आले.

सीबीआयने याआधीच अमोल काळे, अमित दिग्वेकर आणि राजेश डी. बंगेरा यांना ताब्यात घेऊन चौकशी चालवली आहे.