Sun, Aug 25, 2019 20:05होमपेज › Belgaon › रानमेवा विकून भागवितात शैक्षणिक खर्च

रानमेवा विकून भागवितात शैक्षणिक खर्च

Published On: Apr 24 2018 1:05AM | Last Updated: Apr 23 2018 8:43PMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगावसह चंदगड तालुक्यावर निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केली आहे. पावसाळ्यात पर्यटनाच्या माध्यमातून काहीअंशी रोजगार मिळतोच आहे. पण भर उन्हाळ्यात डोंगर दर्‍यातून उपलब्ध असणारा रानमेवाही आर्थिक हातभार लावत आहे. नेमकी हीच संधी साधून बेकीनकेरे, होसूर परिसरातील शालेय विद्यार्थी या रानमेव्याची विक्री करून आपल्या आगामी शैक्षणिक वर्षाच्या खर्चाची तजवीज करून ठेवत आहेत. 

बेळगाव तालुक्याच्या सीमेवर आणि चंदगड तालुक्यात असलेल्या महिपाळगड, वैद्यनाथ जंगल परिसराला पश्‍चिम घाटाच्या विशेष पट्ट्यात मानाचे स्थान आहे. या जंगल परिसरात अनेक प्रजातीच्या औषधी वनस्पती आहेत. तसेच वन्यप्राण्यांची वर्दळही आहे. याच परिसरात करवंदे, चुरणे, जांभूळ असा रानमेवा मोठ्याप्रमाणात आहे. विलायती चिंचाही उपलब्ध आहेत. 

बेकिनकेरे, होसूर परिसरातील शालेय विद्यार्थी गटागटाने पहाटेपासून होसूर गावात व महिपाळगडाच्या पायथ्याशी असणार्‍या जंगलात जाऊन  रानमेवा आणतात. त्यानंतर कोवाड -बेळगाव मार्गावर होसूर घाटात येणार्‍या-जाणार्‍या वाहनधारकांना हात करून फळांची विक्री केली जाते. दोन-तीन महिन्यात प्रत्येक विद्यार्थी किमान हजारहून अधिक रुपये कमाई करतात. सध्या शाळांना सुट्टी असल्याने थोड्यावेळात घरची कामे आटपून करवंदे, जांभूळ गोळा करण्यासाठी जायचे. हा नेहमीचा दिनक्रम सुरू आहे.

होसूर घाटातून बेळगावला रोज शेकडो चारचाकी, दुचाकींची वर्दळ असते. त्यामुळे करवंदे विक्रेत्यांची मोठी कमाईही होते. या विक्रीतून मिळालेल्या पैशातून घराच्या कामासाठीही हातभार लागत आहे.  या विद्यार्थ्यांकडून सुट्टीचा सदुपयोग होत असून त्यांच्या या परिश्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे. 

 

Tags : belgaon, belgaon news, student, Ranmeva, Academic,