Fri, Aug 23, 2019 14:25होमपेज › Belgaon › शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची पसंती महाराष्ट्राला

शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची पसंती महाराष्ट्राला

Published On: Jul 05 2018 1:37AM | Last Updated: Jul 05 2018 12:19AMबेळगाव : प्रतिनिधी

कर्नाटकाच्या तुलनेत महाराष्ट्रात कमी शुल्कात पदवीपूर्व शिक्षणाची सोय होत असल्याने सीमाभागातील अनेक मराठी भाषिक विद्यार्थी महाराष्ट्रातील महाविद्यालयांना पसंती देत आहेत. बेळगाव तालुक्याच्या पश्‍चिम भागातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी हलकर्णी, कोवाड, कार्वे, शिनोळी, तुडये, पाटणे फाटा येथील महाविद्यालयामध्ये दाखल होत आहेत.

सीमाभागातील मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना पदवीपूर्व शिक्षण इंग्रजीमधून घ्यावे लागते. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची अनेकवेळा गोची होती. परिणामी अकरावी, बारावीला नापास होणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. हे टाळण्यासाठी नजिकच्या चंदगड तालुक्यातील शाळांना पसंती देण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील अकरावी व बारावीचा अभ्यासक्रम मराठीतून शिकवण्यात येतो. त्याठिकाणी मराठमोळे वातावरण असते. प्राध्यापक मराठी भाषिक असतात. त्यामुळे सीमाभागातील विद्यार्थ्यांना बेळगाव परिसरातील महाविद्यालयापेक्षा महाराष्ट्रातील महाविद्यालये आपली वाटत आहेत. याठिकाणी अभ्यास करून पदवी मिळविणे कर्नाटकच्या तुलनेत अधिक सोपे असल्याची भावना विद्यार्थ्यामध्ये निर्माण झाली आहे.

त्याचबरोबर बेळगाव परिसरातील महाविद्यालयामध्ये प्रवेशशुल्क अधिक प्रमाणात आकारण्यात येते. वेगवेगळ्या फंडाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची लूट करण्यात येते. त्या तुलनेत महाराष्ट्रातील महाविद्यालयाकडून अत्यल्प शुल्क आकारण्यात येते. अन्य निधी घेण्यात येत नाही. यामुळे कर्नाटकच्या तुलनेत महाराष्ट्रातील महाविद्यालयामध्ये कमी शुल्कामध्ये शिक्षण होते.

महाराष्ट्रात अकरावी, बारावी वर्गाच्या कला आणि वाणिज्य शाखेसाठी 1500 पर्यंत विज्ञान शाखेसाठी 2 हजार ते 2500 पर्यंत शुल्क आकारण्यात येते. कर्नाटकात अकरावी, बारावी प्रवेशासाठी किमान 15 ते 20 हजार पर्यंत खर्च येतो. त्याचबरोबर सर्व विषय इंग्रजी माध्यमातून शिकवण्यात येतात. यामुळे विद्यार्थ्यांची धाव महाराष्ट्राकडे वाढत आहे.

तालुक्याच्या पश्‍चिम भागातील उचगाव, सुळगा, कल्लेहोळ, तुरमुरी, कोनेवाडी, बाची, कुद्रेमानी परिसरातील विद्यार्थी कार्वे, पाटणे फाटा, हलकर्णी परिसरात तर बेळगुंदी, यळेबैल, राकसकोप्प, बिजगर्णी, बेळवट्टी, बडस, सोनोली परिसरातील विद्यार्थी तुडये महाविद्यालयाकडे धाव घेत आहेत. त्याचबरोबर बेकिनकेरे, उचगाव, बसुर्ते, अतिवाड परिसरातील विद्यार्थी कोवाड भागाकडे शिक्षणासाठी जात आहेत. याचा फटका बेळगाव परिसरातील व शहरातील काही महाविद्यालयांना बसत आहे. 

बसपासची डोकेदुखी

महाविद्यालयाकडून आकारण्यात येणारे प्रवेश व इतर शुल्क कमी असले तरी बसपासची डोकेदुखी महाराष्ट्रात अधिक प्रमाणात आहे. कर्नाटकाच्या तुलनेत महाराष्ट्र परिवहन मंडळाकडून विद्यार्थ्यांना अधिक दराने बसपास पुरविण्यात येतो. कर्नाटकातील विद्यार्थ्यांना ही सुविधा नाकारण्यात येते. यामुळे विद्यार्थ्यांना प्रवासासाठी अधिक रक्‍कम खर्चावी लागते.