Mon, Jun 17, 2019 02:54होमपेज › Belgaon › बंद पथदीपांवरून अभियंते धारेवर

बंद पथदीपांवरून अभियंते धारेवर

Published On: May 29 2018 1:44AM | Last Updated: May 29 2018 12:54AMबेळगाव : प्रतिनिधी

शहरातील अनेक ठिकाणचे पथदीप व हायमास्ट बंद पडलेले असले तरी दुरुस्त करण्याकडे इलेक्ट्रीकल अभियंत्यांनी व कंत्राटदारांनी दुर्लक्ष केल्याबद्दल सोमवारी झालेल्या मनपा प्रशासकीय बैठकीमध्ये त्यांना धारेवर धरण्यात आले. 

बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर बसाप्पा चिक्‍कलदिन्नी होते. बेळगाव शहरातील 30 टक्के पथदीप बंद पडलेले असल्याने नागरिकांना रात्रीच्यावेळी अंधारातून ये-जा करावी लागत आहे. महात्मा फुले रोडवरील सर्वच पथदीप बंद पडलेले आहेत. टीचर्स कॉलनीमधील हायमास्ट  बंद पडलेले आहेत. त्यासंदर्भात कंत्राटदाराकडे व इलेक्ट्रीकल विभागाच्या अभियंत्याकडे तक्रारी केल्या तरी त्याची दुरुस्ती केलेली नसल्याची तक्रार माजी महापौर किरण सायनाक, रवि धोत्रे, संजय सव्वाशेरी व इतरांनी केली. 

कंत्राटदारांकडे पथदीप दुरुस्तीच्या एकूण 8 गाड्या पाहिजेत. परंतु त्यांच्याकडे केवळ चारच गाड्या कार्यरत आहेत. पथदीपांबद्दल नगरसेवकांनी व नागरिकांनी तक्रारी केल्या तरी पथदीप दुरुस्ती करणार्‍या जिप शहराच्या वेगळ्याच ठिकाणी असल्याचे सांगण्यात येते. पथदीप बंद पडल्याची तक्रार केली असता ते कोठे बंद पडलेत ते दाखविण्यास या, असे ते कर्मचारी नगरसेवकांनाच आदेश देत असल्याची तक्रार संजय सव्वाशेरी यांनी मांडली

बंद पडलेले हायमास्ट दुरुस्त करण्याची जबाबदारी कंत्राटदारांची व इलेक्ट्रीकल विभाग अभियंत्याची आहे. अरविंद इलेक्ट्रीकल या कंत्राटदाराने दोन वर्षे पथदीपांचे कामच केले नव्हते. मनपा सभागृहाने त्यांचे बिल देऊ नये, असा ठरावही केला होता. परंतु मनपाने त्या बिल अदा केले होते. त्यामुळे पथदीप विभागामध्ये किती अंधाधुंद कामकाज चालले आहे ते लक्षात येते, असे किरण सायनाक म्हणाले.
मनपाचा महसूल विभाग म्हणावी तशी वसुली नसल्याने मनपाच्या खजिन्यामध्ये ठणठणाट आहे. शहरातील बेकायदा इमारत मालकांकडून दुप्पट कर वसूल केला जात आहे. जिल्हाधिकार्‍यांनी एक बैठक घेऊन दुप्पट कर वसूल करू नये, अशी सूचना केलेली असली तरी  महसूल विभाग दुप्पट कर वसूल करीत असल्याची तक्रार नगरसेवक रमेश सोनटक्‍की यांनी केली. 

मनपाचे कर्मचारीच महसूल गोळा करण्याकडे टंगळमंगळ करीत असतील तर महसूल कसा गोळा होणार? असे दीपक जमखंडी यांनी विचारले. महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्या बैठका घेण्यात आल्या पाहिजेत. परंतु त्या बैठका घेण्यात आल्या नाहीत ते काम केवळ नगरसेवकांनी करावयाचे का? असा प्रश्‍नही जमखंडी यांनी आयुक्‍तांना विचारला.

डॉ. दिनेश नाशिपुडी यांनी मनपाच्या प्लॉटवर अनेक घरे बांधलेली आहेत. त्या संबंधी कार्यवाही केव्हा करणार? मनपाच्या प्लॉटवर घरे बांधताना मनपाचा स्टाफ काय करीत असतो. प्लिथं लेव्हलवरतीच ती बांधकामे रोखण्याचे काम मनपाने करण्याची आवश्यकता आहे, असे सांगितले.  त्यावर शहर अभियंता आर. एस. नायक म्हणाले, बनावट कागदपत्राद्वारे मनपाच्या प्लॉटवर घरे बांधण्याकरिता बांधकाम परवाने घेण्यात आले आहेत. ते प्लॉटस् मनपाचे असल्याने आता त्यावरील परवाने रद्द करता येतात. 

मनपाचे कायदा अधिकारी अ‍ॅड. उमेश महंतशेट्टी म्हणाले, मनपाच्या त्या प्लॉटस्बद्दल न्यायालयात खटले चालू आहेत. त्या खटल्यांचा निकाल लागल्यानंतर ते प्लॉटस् ताब्यात घेता येतील. 

हेस्कॉम अभियंतेही धारेवर

बेळगाव शहरामध्ये भूमिगत केबल घालण्याकरिता हेस्कॉमने शहरातील अनेक रस्ते खोदले आहेत. परंतु त्याची दुरुस्ती केलेली नाही. त्याबद्दलही या बैठकीमध्ये हेस्कॉम अभियंत्याला धारेवर धरण्यात आले.  ते नादुरुस्त रस्ते तातडीने दुरुस्त करण्याकडे हेस्कॉमने गांभीर्याने लक्ष द्यावे, असा आदेश आयुक्‍त तायण्णावर यांनी दिला.

धोकादायक वृक्ष

शहरातील धोकादायक वृक्षाबद्दलही बैठकीमध्ये जोरदार तक्रार करण्यात आली. धोकादायक वृक्ष तोडण्याबद्दल तक्रारी केल्यातरी वनखात्यातर्फे लक्ष देण्यात येत नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांना व वाहनचालकांना त्या धोकादायक वृक्षांचा धोका वाढलेला आहे. आतापर्यंत शहरातील 42 वृक्ष तोडण्यात आल्याची माहिती वनाधिकार्‍यांनी दिली. 

मनपा आयुक्‍त कृष्णेगौडा तायण्णावर यांनी वनखात्याने शहरातील धोकादायक वृक्षांची पाहणी करून ती झाडे तोडण्यात यावीत, त्याशिवाय वीजवाहिनीला वृक्षांच्या फांद्या लागलेल्या असतील तर त्या फांद्या तोडण्याचे कामही वनखात्याने तातडीने हाती घ्यावे, असा आदेश बजावला.