Wed, May 22, 2019 16:25होमपेज › Belgaon › पथदीप ‘बंद’, डोळे ‘उघड’णार?

पथदीप ‘बंद’, डोळे ‘उघड’णार?

Published On: May 30 2018 2:15AM | Last Updated: May 29 2018 8:07PMबेळगाव : प्रतिनिधी

शहरातील पथदीपांवर मनपा दरवर्षी साडेतीन कोटी रुपयांचा खर्च करते. तरीही 30 टक्के पथदीप कायमस्वरूपी बंदच असतात, अशी तक्रार मनपाच्या प्रशासकीय बैठकीमध्ये खुद्द नगरसेवकांनीच केली. आता तरी बंद पथदीप महापालिका प्रशासनाचे डोळे उघडणर का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.  

शहरातील पथदीपांची दुरुस्ती व देखभाल कंत्राट मनपाने एजी पॉवर कंपनीला दिले आहे. कंपनीने शहरातील पथदीपांची दुरुस्ती व देखभाल करण्याकरिता 8 वाहने तैनात करून, कर्मचार्‍यांची नियुक्‍ती केली पाहिजे. परंतु प्रत्यक्षात दुरुस्ती व देखभाल करणारी चारच वाहने कार्यरत आहेत. त्यावरील कर्मचार्‍यांची संख्याही कमी असल्याची तक्रार नगरसेवकांनी महापौर व आयुक्‍तांकडे केली आहे. 
एखाद्या ठिकाणचे पथदीप बंद पडल्यानंतर नगरसेवकांनी या संदर्भातील तक्रार ए. जी. पॉवर कंपनीकडे केली तर कंपनीचे कर्मचारी उलट नगरसेवकांनाच पथदीप बंद पडलेल्या ठिकाणी येऊन तुम्ही दाखवा, असे सांगतात. 

शहरातील बंद पथदीपांची पाहणी कंपनीच्या सुपरवायझर्सनी करून ते दुरुस्त केले पाहिजेत. एजी पॉवर कंपनीचे मालक मोहन ख्रिस्तोफर मनपा अधिकारी व काही नगरसेवकांना कायम खूश ठेवण्याचे काम करतात, अशी चर्चा आहे. यामुळे इतर नगरसेवकांनी बंद पडलेल्या पथदीपांबद्दल कितीही तक्रारी केल्या तरी त्यांना कोणता फरक पडत नाही. त्यांचे बिल व्यवस्थित अदा केले जाते. यामुळे तक्रारदार नगरसेवकांची काहीच किंमत त्यांच्यासमोर नाही. 

शहरातील बंद पथदीपांचा अहवाल सुपरवायझर्सनी मनपाच्या इलेक्ट्रीकल विभाग अभियंत्यांना दररोज सादर केला पाहिजे. तो सादर केल्याप्रमाणे बंद पथदीप दुरुस्त केले पाहिजेत, हा निविदेतील प्रमुख नियम आहे. परंतु याचेच उल्लंघन कंपनीने केलेले आहे. यावरून कंपनीला काही नगरसेवकांचा व अधिकार्‍यांचा आशीर्वाद आहे हे सिध्द होते, असे काही नगरसेवकांचे म्हणणे आहे. 

प्रशासकीय बैठकीमध्ये अनेक नगरसेवकांनी पथदीपांच्या तक्रारी केल्या. त्याचे निवारण येत्या आठवडाभरात करण्याचा आदेश मनपा आयुक्‍त कृष्णेगौडा तायण्णवर यांनी बजावलेला आहे. पण त्यावर अंमलबजावणी होणार का, हा प्रश्न आहे.

शहरामध्ये 18,331 सोडियम व्हेपर्स व 6,660 ट्यूब लावण्यात आल्या आहेत. शिवाय प्रमुख चौकांच्या ठिकाणी हायमास्ट लावलेले आहेत. पैकी अनेक ठिकाणचे हायमास्ट बंद पडलेले आहेत. ते दुरुस्त करण्यासाठी अद्याप कंपनीने काहीच प्रयत्न केले नसल्याची तक्रारही प्रशासकीय बैठकीमध्ये नगरसेवकांनी केली.