Fri, Apr 26, 2019 09:27होमपेज › Belgaon › वादळी पावसाचा तडाखा

वादळी पावसाचा तडाखा

Published On: Jun 02 2018 2:00AM | Last Updated: Jun 01 2018 11:18PMबेळगाव : प्रतिनिधी

मान्सूनची चाहूल लागली असतानाच, शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास वादळी पावसाने शहर परिसराला झोडपून काढले. वादळामुळे तब्बल 15 झाडे, 25 वीज खांब आणि 5 ट्रान्स्फॉर्मर आडवे झाले आहेत. अनेक घरेही पडले आहेत. तर सखल भागांतील घरात पाणी शिरले होते. वीज वाहिन्यावर झाडे कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. शहराच्या मध्यवर्ती भागात काही आस्थापने व घरात पावसाचे पाणी शिरल्याने सर्वत्र धावपळ उडाली. 

सायंकाळी विजेच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. महापालिकेने गटारी स्वच्छ न केल्यामुळे बाजारपेठ, उपनगरासह अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले. शनिवार खुट, काकतीवेस आदी ठिकाणच्या गटारीतील पाणी भोई गल्लीत येऊन तुंबले.  अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेत भाजी विक्रेत्यांची धावपळ उडाली. खडेबाजार, गणपत गल्ली येथील भाजी विक्रेते आपली जागा सोडून मोठ्या अस्थापनाचा आधार घेतला. 

ठिकठिकाणी नुकसान

जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या रस्त्यावर झाडे वीजवाहिनीवर कोसळल्याने काही खांब कोसळले. त्याच क्षणी परिसरातील वीज पुरवठा खंडति झाला. तातडीने हेस्कॉमच्या अधिकार्‍यांनी जेसीबीच्या सहाय्याने  दुरुस्तीकाम हाती घेतले. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी होती. गर्दीला पांगविण्यासाठी पोलिसांनाही पाचारण करण्यात आले होते. अर्ध्या तासानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
तसेच चव्हाट गल्लीला जाणार्‍या रस्त्यावरील रेणुका झेरॉक्सच्या समोरील प्रांताधिकारी कार्यालयाची भिंत कोसळली. कॅम्प शौर्य चौक येथील माजी सैनिक संघटनेच्या कार्यालयाचे छत वादळी वार्‍याने उडून गेले. यात हजारो रुपयांचे नुकसान झाले. कार्यालयात असणारे संगणक व महत्वाची कागदपत्रे भिजली.

सखल भागात पाणी

शहरातील मध्यवर्ती भागातील भेंडी बाजार, मोतीलाल चौक, भोई गल्ली आणि पांगुळ गल्लीतील घरे व आस्थापनांमध्ये पावसाचे पाणी भरले. मोतीलाल चौकात नव्याने करण्यात आलेला रस्ता आणि गटारींची उंची वाढविल्याने सखल असणार्‍या घरात व दुकानात पाणी घुसल्याने नुकसान झाले. मनपाच्या कारभाराबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. विश्वेश्‍वरय्या नगरातील वन खात्याच्या समोरील झाड वीजवाहिनीवर कोसळल्याने नुकसान झाले. तसेच कँम्प, सदाशिवनगर, जिल्हाधिकार्‍यांचे निवासस्थान, हनुमाननगर, वडगाव, कॉलेज रोड, क्‍लब रोड, बेळगाव-बागलकोट रोड, गांधीनगर ब्रिज आदी ठिकाणी झाडे कोसळली. तसेच चव्हाट गल्ली, ढोर गल्ली आदी ठिकाणी घरावरील छत उडून गेले. गांधीनगर ब्रीजखाली गुडघाभर पाणी साचले होते.