Wed, Jun 26, 2019 23:32होमपेज › Belgaon › कोगनोळीतील मुरुम चोरीवर हवा अंकुश 

कोगनोळीतील मुरुम चोरीवर हवा अंकुश 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोगनोळी : वार्ताहर

कोगनोळी (ता. चिकोडी) येथील सरकारी गायरान जमिनीतील मुरूम चोरीप्रकरणी कोगनोळीचे महसूल अधिकारी शिरीष पवार व त्यांचे सहकारी आनंदा मडिवाळ यांना मुरूम चोरट्यांनी मारहाण केली. त्यामुळे हे प्रकरण गांभीर्याने घेऊन असे कृत्य करणार्‍यांवर अंकुश ठेवण्याची मागणी जोर धरत आहे.

कोगनोळीतील गायरान नेहमीच चर्चेचा विषय बनला आहे. सदर गायरानामध्ये अतिक्रमण, मुरूम  उपसा करुन गायरानच उद्ध्वस्त करण्यात येत आहे. याबाबत कोगनोळी ग्रा. पं. सभेमध्ये वारंवार चर्चाही झाली. गायरान वाचविण्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी शिरीष पवार व दत्तात्रय जगदाळे यांनी वारंवार प्रयत्न केले.

गायरानात मुरूम काढणे,  दगडाच्या खाणी काढणे असे प्रकार राजरोसपणे सुरु होते. पवार यांनी रात्री-अपरात्री अशा घटनांवर नजर ठेवून अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला. शिवाय पोलिस खात्याच्या मदतीने गायनातून मुरूम न काढण्याची लेखी हमी घेतली होती. तरीही किरण मगदूम व प्रवीण भोजे यांच्यासह अन्य एकाने रात्रीच्यावेळी मुरूम काढण्याचे काम सुरू केले होते. सदर माहिती शिरीष पवार यांना समजताच त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. पण मुरुम चोरी करणार्‍यांनी त्यांच्या सूचनांची अंमलबजावणी न करता त्यांनाच मारहाण केली. 

कोगनोळीत रात्रीच्यावेळी ट्रॅक्टरच्या साहाय्याने कोणीही मुरुम काढते. बिरोबा माळ परिसर, हणबरवाडी रोड परिसर व हंचिनाळ परिसरात माळाभागात मोठ्याप्रमाणात मुरुम उपसा करण्याचे काम सुरु असते. शेतकर्‍यांनी तहसीलदार, जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करून मुरूम माफियावर आळा बसविण्याचा प्रयत्न केला होता. आता चक्क अधिकार्‍याला मारहाण झाल्याने पुन्हा एकदा कोगनोळीतील मुरुम चोरीप्रकरण व दगड चोरीप्रकरण चर्चेत आले आहे. 

तलाठी शिरिष पवार यांना मारहाण झाल्याने अधिकारीवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  तहसीलदार अथवा  संबंधित अधिकार्‍यांनी केवळ बघ्याची भूमिका न घेता कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. शासकीय अधिकार्‍याला मारहाण करणे चुकीचे असून त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहणार असल्याचे ग्रा. पं. सदस्य मारुती कोळेकर यांनी दै. पुढारी बोलताना सांगितले.
तहसीलदार डंबळ यांच्यानंतर कारवाईच नाही गायरानातच अतिक्रमण झालेल्या पार्श्‍वभूमीवर तत्कालीन तहसीलदार डंबळ यांनी घटनास्थळी भेट देऊन कारवाई केली होती. त्यानंतर आजतागायत कोणतीच कारवाई न झाल्याने मोठ्याप्रमाणात मुरुम उपसा सुरु आहे.
 


  •