Wed, Mar 20, 2019 09:08होमपेज › Belgaon › युवराजांच्या वाटेत काटे पेरा....

युवराजांच्या वाटेत काटे पेरा....

Published On: May 07 2018 2:01AM | Last Updated: May 07 2018 12:06AMकैलासावर नारदांची स्वारी धडकली. असं वैकुंठ सोडून अचानक आमच्याकडं आपली पावलं कशी वळली? काही खास नक्‍की असणार आणि ते नारायणाना न सांगता आमच्याकरिता असणार ना नारदा, असं म्हणत महादेवांनी खडा टाकला. 

ईश्वराला कळलं की काय, अशा प्रश्नार्थक मुद्रेने नारदांनी देवाकडेे पाहिले. ते म्हणाले, एक खबर आणलीय. भरतवर्षातले एक युवराज आपल्या भेटीला येणार आहेत.असं होय, ते आम्ही जाणून आहोत. आपण श्री विष्णूंच्या आज्ञेनं पृथ्वीतलावर जाण्याची अनुमती मागितली होती. पण त्यांनी एक अट घातली होती. इकडं तिकडं न फिरता कृष्णा, कावेरी, तुंगभद्रा, मलप्रभा, घटप्रभा या पवित्र पंचनद्यांच्या प्रदेशात जाऊन तिथली बित्तंबातमी आणायची. वेश परिधान करून जा. ज्या भागात जाल तेथला ध्वज खांद्यावर घेऊन टोपी बदलत राहा. म्हणजे तेथील प्रत्येक गोटातील माहिती जाणून घेता येईल. ही कल्पना आम्हीच नारायणाना सांगून तुमची भ्रमंती करवली, महादेवांनी सांगून टाकले. नारदांना आश्चर्य वाटले.

महादेव म्हणाले, ‘युवराजांबाबत आपण काय खास माहिती आणलीय, ती कथन करा.’
नारदांना हुरूप आला. ते म्हणाले, ‘हे युवराज एका पंथाचे आहेत. त्यांच्या मातोश्रींनी हे 

सर्वोच्च पद सोडलं आणि वंशपरंपरेनं ते युवराज झाले. त्यांची निवड म्हणजे बनाव होता, हे दुसर्‍या एका पंथाच्या खबर्‍यानं मला सांगितलं. या पंचनद्यांच्या टापूत अधिकारावर कोणी यायचं, यासाठी जनमत आजमावण्याचा कार्यक्रम 12 मे रोजी आहे. यामुळं देवांना साकडं घालण्यासाठी मंदिरांतनू गर्दी होत आहे. आपली वाहनं वेगळी, त्यांची वेगळी. ती धूर ओकतात. त्यातून जोरजोरानं आपली भूमिका सत्तेसाठी मांडली जातात. काही भक्‍तांनी सत्यनारायण नव्हे तर सत्तानारायणाची पूजा केली. हे पाहून चाटच पडलो. आमच्या मर्जीशिवाय पानही हलत नाही, असं देवांनी समजू नये. ही त्यांची मक्‍तेदारी निकालात काढली जात आहे. युवराजांबाबत सांगायचं तर ते पक्के आहेत. त्यांनी आताशा मंदिरातून एन्ट्री चालवली आहे. तसं इतरही यात मागं नाहीत. देवेगौडास्वामींनी तर शनिदेवाला साकडं घातलं होतं. सर्व स्वामीजी त्यांना आपलेच वाटतात. तेही सत्तेसाठी बरं का! युवराज आता कैलासावर येणार आहेत. स्वारीनी आपलं सावध असावं इतकंच.महादेवांनी नंदीला आज्ञा केली. युवराजांच्या वाटेत काटे पेरा. चिखल माजवा. मध्येच कडक ऊन आणि जोराचा मेघवर्षाव करवा. 

यातून युवराज सहीसलामत सुटले तर आमची परीक्षा ते उत्तीर्ण झाली असं समजूया. ते यातून आले की त्यांच कमळ, विविध पुष्पांचा सडा घालून पायघड्या घालून त्यांचं स्वागत करा. युवराज यात नापास झाले तर सत्तेची माळ त्यांवच्या गळ्यात पडणे कठीण आहे. पाहूया 12 च मैदान जचळच आहे. ही आज्ञा ऐकून नंदी तयारीला लागला. 

सुनील आपटे