होमपेज › Belgaon › दक्षिणेचा तिढा, समस्यांचा पडला वेढा

दक्षिणेचा तिढा, समस्यांचा पडला वेढा

Published On: Jun 07 2018 2:04AM | Last Updated: Jun 07 2018 12:26AMबेळगाव : शिवाजी शिंदे

शहराच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असणार्‍या दक्षिण मतदारसंघात बळ्ळारी नाल्यावरचे अतिक्रमण, हलगा-मच्छे बायपास रोड संपादन, बेकायदा वसाहतींचे पेव आणि उड्डाणपुलांची सुव्यवस्थित, वादरहित उभारणी ही मुख्य आव्हाने आहेत.

शहरी आणि ग्रामीण असा संमिश्र तोंडावळा असणार्‍या मतदारसंघातील समस्यादेखील भिन्न आहेत.   मराठी भाषिकांची सर्वाधिक संख्या असणार्‍या मतदारसंघात भाजपने पहिल्यांदा अस्तित्त्व निर्माण केले होते. 2008 मध्ये या मतदारसंघातून अभय पाटील निवडून आले होते. 2013 मध्ये म. ए. समितीने ही जागा भाजपला पराभूत करून मिळवली. आता 2018 मध्ये पुन्हा भाजपने ती जागा जिंकली. विक्रमी मताधिक्क्याने अभय पाटील यांना विजय मिळाला. आत. आ. पाटील यांना निवडणुकीपूर्वी  मतदारांना दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता करावी लागणार आहे.

मतदारसंघात शहराचा निम्मा भाग आणि येळ्ळूर, मच्छे, पिरनवाडी व धामणे ग्रा. पं. कार्यक्षेत्राचा समावेश आहे. त्याचबरोबर शहराच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असणार्‍या औद्योगिक वसाहती याच मतदारसंघात आहेत.\

बळ्ळारी नाला, हालगा-मच्छे बायपासरोड, उड्डाणपूल, वाहतुकीची कोंडी, औद्योगिक वसाहती, वाढत्या नागरी वसाहती या समस्या आ. पाटील यांच्यासमोर आहेत. त्याचबरोबर ग्रा. पं. ना भेडसावार्‍या पाणी समस्येवर मात करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. मतदारसंघाचा झपाट्याने विस्तार होत आहे. त्या तुलनेत समस्याही वाढत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्याबरोबर नियोजन करण्यासाठी कसरत करावी लागणार आहेत. यासाठी आजवरच्या त्यांच्या अनुभवाची कसोटी लागणार आहे.