Sat, Feb 23, 2019 00:42होमपेज › Belgaon › मोटारपंप सुरु करताय... व्हा सावध!

मोटारपंप सुरु करताय... व्हा सावध!

Published On: Sep 01 2018 1:45AM | Last Updated: Aug 31 2018 8:07PMबेळगाव : प्रतिनिधी

सध्या पावसाळा सुरु आहे. यामुळे पिकांना पाणी देण्याची गरज शक्यतो भासत नाही. मात्र, ग्रामीण भागात  काहीजण घरातदेखील शेतीतील विहिरीचे पाणी वापरतात. यामुळे पाण्याच्या मोटारचा वापर सतत होतो. पावसाळ्यात सर्वत्र थंड वातावरण असते. त्यामुळे साप उष्ण जागेच्या शोधात असतात. मोटारीची पेटी उष्ण असल्याने यामध्ये साप राहण्याची शक्यता असते. यामुळे शेतकर्‍यांनी दक्षता घेण्याची गरज आहे. कावळेवाडी (ता.बेळगाव) येथील एका शेतकर्‍याच्या मोटारच्या पेटीमध्ये साप आढळून आला. संबंधित शेतकर्‍याच्या दक्षतेमुळे धोका टळला. यामुळे प्रत्येक शेतकर्‍याने खबरदारी घेणे गरजेचे बनले आहे. 

पावसाळा सुरु असला तरी ग्रामीण भागातील शेती पंपाचा वापर सर्रास होतो. पेटीतून वायर घालण्यासाठी लहान छिद्र ठेवले जाते. त्यातून साप आत प्रवेश करू शकतो. तसेच अनेक शेतकर्‍यांची मोटारीच्या पेटीला दरवाजे नाहीत. तसचे झाडाखाली पेटी असल्याने साप येण्याचा धोकादेखील अधिक असतो. 

पावसाळा संपत आला आहे. यानंतर शेतकर्‍यांकडून भाताला पाणी देण्यासाठी शेती पंपाचा वापर वाढणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी मोटार सुरू करताना योग्य ती खबरदारी घ्यावी.  ग्रामीण भागात दिवसा थ्री फेज वीजपुरवठा कमी केला जातो. यामुळे शेतकरी रात्रीच्या वेळी शेतीला पाणी देण्यासाठी जातात. अनेक शेतकर्‍यांच्या मोटार पेटीत बल्ब नसतो. अशावेळी धोका निर्माण होऊन शकतो. त्यासाठी काळजी घेणे अत्यावश्यक आहे.