Sun, May 26, 2019 18:40होमपेज › Belgaon › खडेबाजार, गणपत गल्लीत जायचे कसे?

खडेबाजार, गणपत गल्लीत जायचे कसे?

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी 

स्मार्टसिटी योजनेत बेळगावचा समावेश झाल्याने शहराची नवी ओळख होत आहे. पण प्रमुख आणि स्मार्ट बाजारपेठ म्हणून नावारूपास आलेल्या खडेबाजारात चारचाकी वाहन घेऊन जाणे मोठे मुश्किल बनले आहे. गणपत गल्ली कॉर्नर, पांगुळ गल्ली आणि भोई गल्ली या तिन्ही ठिकाणी सिडीवर्क सुरू आहे. ही कामे अत्यंत धीम्यागतीने सुरू असल्याने व्यापार्‍यांसह स्थानिक नागरिकांतून तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.  

चारचाकीला बाजारपेठेत जाण्यास वावच नसल्याने कोट्यवधींच्या उलाढालीत घट झाली आहे. सिडीवर्क संथ गतीने सुरू असल्याने मंगळवारी महापालिका अभियंता संजीव याना व्यापार्‍यांनी धारेवर धरले. 

प्रभाग 34 मधील गणपत गल्ली कॉर्नर येथे तीन महिन्यापासून सिडीवर्क सुरू आहे. हे काम अत्यंत कूर्मगतीने होत  आहे. यामुळे व्यापार्‍यांत नाराजी आहे. काम संपण्याअगोदरच  पांगुळ गल्लीत सिडीवर्क सुरू केले. या ठिकाणी वयोवृध्दाना ये-जा करणे त्रासाचे ठरले आहे. यानंतर लगेच भोई गल्लीत सिडीवर्कचे काम सुरू आहे. यामुळे एका बाजूने दुसरीकडे जावयाचे झाल्यास मोठे जिकीरीचे बनले आहे. 

या तिन्ही ठिकाणी केलेल्या खोदाईमुळे संपूर्ण खडेबाजार पेठेतील व्यापार्‍यांतून असंतोष आहे. स्मार्टसिटीच्या नावाखाली अनेक ठिकाणी कामे सुरू आहेत. मात्र  नागरिकांना ये-जा करण्यासाठी पर्यायी  मार्गाचे नियोजन करायला हवे, तसे प्रयत्न महापालिका अधिकार्‍यांकडून होत नाहीत. यामुळेच व्यापार्‍यांनी मंगळवारी दुपारी अभियंता संजीव यांना जाब विचारला. संजीव यांनी कामे तातडीने पुर्ण करण्याची ग्वाही दिली. 


  •