Sun, May 19, 2019 14:39
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › शहरात घुमणार सायकलची ट्रिंग..ट्रिंग..

शहरात घुमणार सायकलची ट्रिंग..ट्रिंग..

Published On: Aug 08 2018 1:47AM | Last Updated: Aug 07 2018 10:51PMबेळगाव : प्रतिनिधी

स्मार्ट सिटी योजनेतून शहरात सायकल सेवा नेटवर्क सुरू करण्यात येणार आहे. वाढत्या वाहनांच्या वापराला आळा घालण्यासाठी सदर सुविधा पुरविण्यात येणार आहे. यामुळे शहरात सायकलचा ट्रिंग...ट्रिंग आवाज घुमणार आहे. यासाठी आवश्यक सूचना 20 ऑगस्टपर्यंत पाठविण्याचे आवाहन मनपा आयुक्त शशिधर कुरेर यांनी केले आहे.

बेळगाव शहर एकेकाळी सायकलचे शहर म्हणून ओळखले जात असे. परंतु, काळाच्या ओघात  शहरात वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होण्याबरोबर प्रदुषणात भर पडत आहे. याला आळा घालण्यासाठी आणि प्रदुषणमुक्त प्रवासाठी स्मार्ट सिटी योजनेतून सायकल सेवा नेटवर्क सुरू करण्यात येणार आहे. याचा लाभ नागरिकांना होणार आहे. या प्रकारची योजना राज्यात सध्या म्हैसूर शहरात कार्यरत आहे. स्मार्ट सिटी योजनेत याचा समावेश करण्यात आला आहे. 

शहरातील एका भागातून दुसर्‍या भागात जाण्यासाठी नागरिकांकडून सर्रास दुचाकी अथवा चारचाकी वाहनांचा वापर केला जातो. यामुळे वायुप्रदुषणाचा प्रश्‍न गंभीर बनत  चालला आहे. रस्त्यावर वाहतूककोंडी निर्माण होत आहे. त्याऐवजी सायकलचा  वापर केल्यास उपरोक्त समस्या टाळणे शक्य होणार आहे. 

शहरात मनपाकडून सायकल सेवा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी ठिकठिकाणी सायकल मिळण्याची सोय करण्यात येईल. त्याठिकाणाहून नागरिकांना सायकल भाड्याने घेऊन इच्छितस्थळी जाणे शक्य होईल. वापरानंतर सायकल कोणत्याही सायकल केंद्रावर परत करण्याची सुविधा पुरविण्यात येणार आहे.

योजनेसंदर्भात नागरिक आणि सामाजिक संघटनाकडून सूचना मनपा आयुक्तांनी मागविल्या आहेत. सायकल स्टँड कोणत्या ठिकाणी असावेत. भाडे कशा प्रकारे आकारावे. सायकल मार्ग कशाप्रकारे तयार करण्यात यावा. यासारख्या सूचना स्मार्ट सिटी कार्यालयात 20 ऑगस्ट पर्यंत पाठवाव्यात असे आवाहन आयुक्त कुरेर यांनी केले आहे.