होमपेज › Belgaon › सहा गावांचा होणार ‘आदर्श विकास’

सहा गावांचा होणार ‘आदर्श विकास’

Published On: Aug 06 2018 1:51AM | Last Updated: Aug 05 2018 11:09PMबेळगाव : प्रतिनिधी

अनुसूचित जाती आणि जमातीसाठी राखीव असणार्‍या मतदारसंघातील गावांसाठी मुख्यमंत्री आदर्श ग्राम योजना लागू करण्यात आली आहे. याचा लाभ जिल्ह्यातील सहा गावांना होणार आहे. प्रत्येक मतदारसंघातील दोन गावांचा योजनेत समावेश केला जाणार आहे. प्रत्येक गावासाठी 75 लाखाचा निधी खर्च केला जाणार आहे.

जिल्ह्यातील यमकनमर्डी हा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी तर रायबाग आणि कुडची हे मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. या मतदारसंघातील अनुसूचित जाती-जमातीची लोकसंख्या निम्म्याहून अधिक असणार्‍या गावांची निवड या योजनेसाठी करण्यात आली आहे. योजनेच्या माध्यमातून शुद्ध पिण्याचे पाणी, रस्ते बांधकाम, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी इमारत, पथदीप सोय, शाळा इमारत याची सोय करण्यात येणार आहे. अनुसूचित जाती-जमातीच्या नागरिकांना दर्जेदार सुविधा पुरविण्यासाठी सदर योजना मुख्यमंत्री आदर्श ग्राम या नावाने सुरू केलेेली आहे. या माध्यमातून मागास गावांचा कायापालट करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित केलेले आहे.

समितीची रचना

योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समिती रचण्यात आली आहे. या माध्यमातून विकासकामे राबविण्यात येणार आहेत. यामध्ये जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी उपाध्यक्ष म्हणून कार्यरत राहणार आहेत. सदस्यपदी सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता व सचिव म्हणून समाज कल्याण खात्याचे संयुक्त संचालक नियुक्त केले आहेत.

योजनेचा उद्देश अनुसूचित जाती आणि जमातीची लोकसंख्या निम्म्याहून अधिक असणार्‍या गावांना शैक्षणिक, आरोग्य  सुविधा पुरविणे, मागास गावांचा सर्वांगीण विकास करण्याचे नियोजन केले आहे.