Tue, Jun 02, 2020 01:01
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › निपाणीत आज मूकमोर्चाद्वारे निषेध

निपाणीत आज मूकमोर्चाद्वारे निषेध

Published On: Dec 29 2017 1:35AM | Last Updated: Dec 29 2017 12:00AM

बुकमार्क करा
निपाणी : प्रतिनिधी

निपाणीला कोणतीही गोष्ट आजपर्यंत चळवळ केल्याशिवाय मिळालेली नाही. तालुका घोषणा झालेली असताना त्यात अचानक बदल करणे म्हणजे तो निपाणी परिसरावर अन्याय आहे. त्यामुळे मंगळवार, दि. 2 जानेवारीपर्यंत निपाणी तालुक्याची घोषणा न केल्यास बुधवारपासून आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा निर्णय निपाणी येथे गुरुवारी घेण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला.

निपाणीला तालुक्याचा दर्जा देण्यास कर्नाटक सरकारने डावलल्याने त्यावर चर्चा करण्यासाठी नगरपालिकेच्या कै.विश्‍वासराव शिंदे सभागृहात सायंकाळी ही बैठक झाली. नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर म्हणाले, कामानिमित्त तालुक्याच्या ठिकाणी जाण्यास नागरिकांचा वेळ व पैसा खर्च होतो. त्यामुळे निपाणी तालुक्याची निर्मिती होणे गरजेचे होते. सर्व तालुका निर्मिती समित्यांनी निपाणीला तालुका करण्याची शिफारस केली असतानाही त्यावर कार्यवाही न होणे हे निषेधार्ह आहे. निपाणी परिसरातील जनतेने आताच याविरोधात आवाज उठविला नाही तर पुन्हा अनेक वर्षे हा प्रश्‍न रेंगाळत राहील.  सर्वांनी पक्षभेद विसरून लढा दिल्यास त्याला यश मिळेल. जिल्ह्यातील दुसरे सर्वात मोठे शहर असणार्‍या निपाणीला मागे टाकण्याचा हा प्रयत्न हाणून पाडणे गरेजेचे आहे.