Sun, Jul 21, 2019 07:46होमपेज › Belgaon › नियोजनशून्य सिग्‍नल व्यवस्था ठरतेय त्रासाची

नियोजनशून्य सिग्‍नल व्यवस्था ठरतेय त्रासाची

Published On: Jan 08 2018 1:12AM | Last Updated: Jan 07 2018 8:02PM

बुकमार्क करा
निपाणी : महादेव बन्‍ने

उरुसानंतर घाईगडबडीत सुरू केलेली सिग्नल व्यवस्था वाहनधारकांसाठी त्रासाची ठरत आहे. कोणतेही नियोजन न करता केवळ 2 मिनिटे वाहतूक अडवून 30 सेकंदासाठी ती सोडली म्हणजे आपले काम झाले, असे समजून पालिका व पोलिस प्रशासन हात वर करत आहे.  यामुळे कोंडीत भरच पडत आहे.

निपाणी बसस्थानक परिसरात रोज उद्भवणार्‍या वाहतूक समस्येवर उपाय म्हणून लाखो रुपये खर्चून सिग्नल  उभारली आहे. मात्र ही यंत्रणा  हाताळण्याबाबत पालिका व पोलिस यंत्रणेने कोणतेच नियोजन केले नसल्याचे दिसून येते. या यंत्रणेबाबतचे ज्ञान वाहनधारक व पादचार्‍यांनाही नाही. 

वेळापत्रक निश्‍चित नसून प्रशासनाच्या मनाला येईल त्याप्रमाणे कधीही सिग्नल सुरू करण्यात येतो. ही यंत्रणा बंद केल्यावर वाहतूक सुरळीत करण्यासाठी एकही पोलिस जागेवर नसतो. सिग्नल सुरू असला तरी डावीकडे जाणारी वाहने त्या दिशेने जाऊ शकतात. पण जागा तोकडी असल्याने डावी बाजू खुली नसते. सिग्‍नल परिसरात रस्त्यावरील अतिक्रमणे हटवलेली नाहीत. अतिक्रमणांमुळे पादचारी व वाहनधारक रस्त्यावरच आल्याने वाहतूक कोंडीत भरच पडत आहे. वाहनाच्या मोठ्या रांगा लागतात.

हिरवा सिग्नल सुरू होताच लवकर कोंडीतून बाहेर निघण्याच्या नादात चालक वेगाने वाहन दामटण्याचा प्रयत्न करतात. यामुळे अपघात होत आहेत. याकडे उपस्थित पोलिस कानाडोळा करतात. यामुळे ही यंत्रणा वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी की वाढविण्यासाठी, हा चर्चेचा विषय आहे. सिग्नलबाबत जागृतीचे काम पालिका व पोलिस यंत्रणेने केले नाही. पादचार्‍यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या झेब्रा क्रॉसिंगची आखणी या ठिकाणी करण्यात आलेली नाही.

यामुळे सिग्नल सुरू असतानाही रस्त्याच्या कोणत्याही बाजूने वाट्टेल तसे पादचारी रस्ता ओलांडत असतात. यामुळे अपघाताची शक्यता असते. या चौकाच्या चारही बाजूवरील रस्त्यांवर अतिक्रमणाचा विळखा असल्याने सिग्नल यंत्रणा प्रभावीपणे राबविण्यावर मर्यादा येत आहेत. पालिका-पोलिस प्रशासनाचे  दुर्लक्ष झाल्याने सिग्नल सुरू असणार्‍या काळात वाहतूक सुरळीत होण्याऐवजी याचे दुष्परिणाम अधिक दिसतात. पालिका व पोलिसांनी सुयोग्य नियोजन करून मगच सिग्नल सुरू करणे गरजेचे वाहनधारक म्हणतात.