Sun, Jul 21, 2019 07:49होमपेज › Belgaon › पोलिस प्रमुखांना ‘शोकॉज’

पोलिस प्रमुखांना ‘शोकॉज’

Published On: Dec 24 2017 1:43AM | Last Updated: Dec 23 2017 9:56PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

जळगे (ता. खानापूर) येथील जमिनीच्या वादातून गणपतराव पाटील या शेतकर्‍याच्या झालेल्या खूनप्रकरणी न्यायालयाने शनिवारी जिल्हा पोलिस प्रमुखांना ‘शोकॉज’ (कारणे दाखवा) नोटीस बजावली. 
शेतामध्येच खून करण्यात आला होता. याप्रकरणी 11 वे अतिरिक्‍त जिल्हा सत्र न्यायाधीश मरुळसिद्धराय्या यांच्यासमोर खटल्याची सुनावणी सुरू आहे. आज सुनावणीला पोलिस अधिकारी समन्स बजावूनही उपस्थित राहिले नसल्याने न्या. मरुळसिद्धराय्या  यांनी जिल्हा पोलिस प्रमुख रविकांतेगौडा यांना ‘तुमच्यावर फौजदारी कारवाई का करू नये, तुमची खातेनिहाय चौकशी का करू नये’, अशी विचारणा नोटिसीद्वारे केली आहे. 

सुनावणीला पोलिस अधिकारी हजर नसल्याचे पाहून न्यायाधीश मरुळसिद्धराय्या यांनी खून प्रकरणाचे  तपास अधिकारी व अतिरिक्‍त जिल्हा पोलिस प्रमुख रवींद्र गडादी यांना न्यायालयामधूनच फोन लावला; परंतु फोन घेण्याचे सौजन्य त्यांनी दाखविले नाही. त्यामुळे न्यायाधीश संतप्त झाले व अखेर त्यांनी जिल्हा पोलिस प्रमुख रविकांतेगौडा यांना नोटीस काढली. 

या खून प्रकरणामध्ये एकूण 48 आरोपी असून त्यामध्ये 4 आरोपी हे अल्पवयीन असल्याने त्यांच्यावर बालसुधार न्यायालयाते खटला सुरू आहे. उर्वरित 44 आरोपींवर 11 वे  अतिरिक्‍त जिल्हा सत्रन्यायालयामध्ये खटला सुरू आहे.