Fri, Jul 19, 2019 20:05होमपेज › Belgaon › शिवराय उड्डाणपूल शनिवारपासून गजबजणार

शिवराय उड्डाणपूल शनिवारपासून गजबजणार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

जुना धारवाड रोडवरील शिवराय उड्डाणपुलाचे बांधकाम 30 मार्चपर्यंत पूर्ण होणार असून शहरातील रहदारीच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या या पुलाचे उद्घाटन 31 मार्च रोजी करण्यात येणार आहे, अशी माहिती केपीआर कंपनीच्या सूत्रांनी दिली. 

शिवराय पुलाच्या उद्घाटनामुळे कपिलेश्‍वर उड्डाणपुलावरील व टिळकवाडी काँग्रेस रोडवरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. खानापूर रोडवरील उड्डाणपुलाचे बांधकाम चाललेले असल्यामुळे व तेथून होणारी वाहतूक अन्य मार्गांनी पोलिस खात्याने वळविल्याने वाहनधारकांची व नागरिकांची रहदारीच्या दृष्टीने अनेक ठिकाणी दररोज कोंडी होत होती. याशिवाय वळसा घालून इच्छित स्थळी ये-जा करण्याकरिता जाादा वेळ व इंधनावर अधिक खर्च करावा लागत होता. बसने ये-जा करणार्‍या नागरिकांना टिळकवाडी काँग्रेस रोडला वळसा घालून वडगाव, शहापूर, उपनगरे व बेळगाव तालुक्यातील दक्षिणेकडील ग्रामस्थांना दररोज वळसा घालूनच ये-जा करावी लागत आहे. आता जुना धारवाड रोडवरील उड्डाण पूल रहदारीसाठी सुसज्ज झाल्याने रहदारीची कोंडी व नागरिकांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.

30 मार्चपर्यंत उड्डाण पुलावरील सर्व आवश्यक कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. सध्या पुलाच्या ठिकाणी डांबरीकरणाचे काम चालले आहे. या पुलासाठी एकूण 85 गर्डर्स घालण्यात आले आहेत. त्यापैकी 5  स्टीलचे वापरण्यात आले आहेत. या पुलाची लांबी 600 मीटर असून रुंदी 40 फूट आहे. रस्त्याच्या मधोमध दुभाजक घालण्यात येणार असून त्या ठिकाणी विजेचे खांबही उभारण्यात येणार आहेत. या पुलासाठी एकूण 16 कॉलमचा वापर करण्यात आला आहे. या पुलाची हमी किती वर्षाची, या प्रश्‍नाला उत्तर देताना केपीआरच्या प्रवक्त्याने 100 वर्षे असे सांगितले. पुलासाठी एकूण 24 कोटी रुपयांचा खर्च केंद्र, तसेच राज्य सरकारतर्फे व बेळगाव मनपातर्फेही निधी खर्च करण्यात आलेला आहे. 
भुयारी गटार योजना, जलवाहिन्या व विद्युत खांबासाठी मनपाने 6 कोटी रुपयांचा निधी खर्च केल्याची माहिती उपलब्ध झाली.


  •