होमपेज › Belgaon › शीतलच्या मारेकर्‍यांना शिक्षा होणार का?

शीतलच्या मारेकर्‍यांना शिक्षा होणार का?

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

संपूर्ण बेळगाव जिल्ह्यात व राज्यात खळबळ उडवून दिलेल्या शीतल चौगुले खून प्रकरणातील आरोपींची उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली असली तरी त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या अपिलावर निकाल एप्रिलच्या अखेरीस अपेक्षित आहे, अशी माहिती अपील दाखल करणारे अ‍ॅड. अनिकेत निकम यांनी दिली आहे. 

शीतल चौगुलेंच्या कुटुंबीयांनी 

सर्वोच्च न्यायालयात अ‍ॅड. अनिकेत निकम यांच्या मदतीने अपिल दाखल केले आहे. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपिल दाखल केलेले असले तरी त्यानंतरचा पाठपुरावा करण्यास कर्नाटक सरकार उदासीन असल्याचे स्पष्ट झाल्याचे अ‍ॅड. निकम यांनी सांगितले. बेळगावमध्ये आले असता त्यांनी महिला संघटनांशी संपर्क साधून ही माहिती दिली. 
अ‍ॅड. निकम म्हणाले, सकृतदर्शनी नराधमांनी गुन्हा केला आहे व त्यामागे कटकारस्थान होते. त्याबाबतचे सर्व पुरावे सिद्धही झाले होते. काही साक्षीदारांतील विसंगतीमुळे उच्च न्यायालयाने त्या संशयितांची निर्दोष मुक्तता केली आहे. त्या विरोधात आता सर्वोच्च न्यायालयामध्ये सर्व पुरावे देण्यात आले आहेत. भीषण खून खटल्याचा युक्तिवाद अ‍ॅड. अनिकेत निकम यांनी सर्वोच्च न्यायालयात मांडला आहे. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने सर्व आरोपींना नोटीस बजाविली आहे. अपिल याचिका अंतिम सुनावणीच्या टप्प्यावर आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात या खटल्याचा महत्त्वपूर्ण निकाल लागणार असल्याचे अ‍ॅड. निकम यांनी सांगितले. 

अ‍ॅड. अनिकेत निकम हे ख्यातनाम सरकारी वकील अ‍ॅड. उज्वल निकम यांचे सुपुत्र असून अ‍ॅड. अनिकेत निकम यांनी आदर्श घोटाळा प्रकरण संरक्षण खात्याच्या वतीने चालवून जिंकले आहे. धनंजय मुंडे प्रकरणातही त्यांनी अटकपूर्व जामीन मिळविला होता. शीतलचे भाऊ विनायक देसाई यांनी सदर खटला अ‍ॅड. अनिकेत यांच्याकडे सोपविला आहे.


  •