Thu, Jul 18, 2019 16:29होमपेज › Belgaon › शबयच्या गजरात शिमगोत्सवाची धूम

शबयच्या गजरात शिमगोत्सवाची धूम

Published On: Mar 06 2018 11:16PM | Last Updated: Mar 06 2018 9:26PMरामनगर : प्रतिनिधी

अनमोड, कलबुली, दुर्गा  देवळ्ळी, कोनशेत, विरझोळ, बाजारकुणंग व तिनई या पश्‍चिम घाटातील सह्याद्रीच्या घनदाट जंगलात वसलेल्या गावांत शिमगोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. परिसरातील शिमगोत्सवाची रया काही औरच असते. शिमग्याच्या खेळाची म्हातार्‍यापासून लहानापर्यंत सर्वांना उत्सुकता असते. ढोल व ताशांच्या तालात शबय...शबय... करत रोमट मारून विविध वेषभूषेत नाचणारे हौशी युवक व ज्येष्ठ नागरिकांनी कुतूहल जागवले.

मंदिर किंवा चव्हाट्यासमोर होळी  नेमात घालून देवाना नमन करून आणि गावकार व  मिराश्यांकडून गार्‍हाणे घालून रोमाट मारले जाते. या प्रसंगी वाजवण्यात येणार्‍या ढोल व ताशांच्या गजराने जंगल परिसरात आवाजाचे प्रतिध्वनी उमटतात आणि आवाजने सर्वांनाच शिमग्याची कैफ चढते.नागरिक शिमग्याचा आनंद लुटतात. होळी पौर्णिमेला सुरुवात झालेला हा शिमगोत्सव पाच दिवस सुरू असतो. पौर्णिमेच्या दुसर्‍या दिवशी धुळवड, (रंगोत्सव) साजरा केला जातो. या उत्सवात या परिसरातील सर्व थरातील लोकांनी सहभागी होऊन रंगोत्सवाचा आनंद लुटला. धुळवडीनंतर प्रत्येक गावातून हौशी नागरिकांकडून खेळ खेळला जातो. यात विविध वेशभूषा व ऐतिहासिक आणि पौराणिक कथाचे सादरीकरण करण्यात आले. याचा आनंद लुटण्यात सर्व तल्लीन झालेले असतात.

‘अनमोड गाव रे चंदीनाथाचे नाव रे शबय, आम्या तुजो ताळ्यो रे आणि दुरीगवगराचे रोमाट रे शबय भलेबैय’ अशी एकापेक्षा एक लोकगीते जती सादर करून शिमगोत्सव बहरतो. फार वर्षापासून या डोंगराळ प्रदेशातील गावात शिमग्याची परंपरा टिकून आहे. पूर्वी करमणुकीचे कुठलेच साधन उपलब्ध नसल्याने शिगमोत्सवातील रोमट परंपरेचा उगम झाला असावा, असे जाणकार म्हणतात. कुठलेही आर्थिक पाठबळ नसताना केवळ विविध कलांच्या माध्यमातून तळीच्या रुपात लोकांकडून देण्यात येणारी रक्‍कम मंदिराच्या कामात वापरली जाते. विविध गावातून येणार्‍या खेळांना पूर्वसूचना दिल्यास गावातील नागरिकांकडून जेवणाची व्यवस्था केली जाते. खेळातील मेळांना गूळपाणी, पंचखाद्य, चहा दिला जातो. तसेच तळी रुपात मानाप्रमाणे नारळ, तांदूळ व पैसे (रुपये) दिले जातात.
सोमवार दि. 5 रोजी मंदिरात जाऊन शिंपणे (नाव्हण) घेऊन या शिमगोत्सवाची सांगता झाली.