होमपेज › Belgaon › मेंढपाळाच्या मुलाची हवाई दलात भरारी

मेंढपाळाच्या मुलाची हवाई दलात भरारी

Published On: Jul 04 2018 2:12AM | Last Updated: Jul 03 2018 7:56PMनिपाणी : प्रतिनिधी

वर्षानुवर्षे भटकंती करीत उदरनिर्वाह करणारा धनगर समाज एकाच ठिकाणी कधीच वास्तव्य करीत नाही. यामुळे मेंढपाळांच्या मुलांचा शिक्षणाकडे ओढा तसा कमी आणि दुर्मीळच. पण जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ध्येय निश्‍चित करून परिश्रम घेतल्यास यशस्वी होता येते, याचे उदाहरण अंमलझरीतील मेंढपाळाच्या मुलाचे देता येईल. मंजुनाथ नवलाप्पा बन्ने असे त्याचे नाव असून त्याने हवाई दलात एअरमन म्हणून प्रवेश मिळवला आहे.

आज इथे आणि उद्या दुसरीकडेच, असा प्रवास असलेल्या आणि एकाच ठिकाणी कधीच वास्तव्य नसलेल्या धनगर समाजातील युवकाने यशस्वी गगनभरारी घेत  तालुक्यातील समाजाच्या इतिहासात मानाचा तुरा खोवला गेला आहे. 

शिक्षणासाठी घरी थांबणे  कठीण असताना मंजुनाथने गावातीलच  नातेवाईकांचा आसरा घेत शाळेत जाण्याचा निर्णय घेतला. सहावीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण झाल्यावर बेडकिहाळ येथे व पुन्हा खडकलाट येथे नातेवाईकांचा आधार घेत दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. दहावीत चांगले गुण मिळाल्याने निपाणीतील जी. आय. बागेवाडी कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. येथे शिक्षण पूर्ण करुन तुमकूर येथील सिद्धार्थ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये तीन वर्षे प्रशिक्षण घेतले. याचवेळी त्याने हवाईदलाची ऑनलाईन परीक्षा देऊन दिली.त्यातही मंजुनाथने यश मिळविले.