होमपेज › Belgaon › म. ए. समिती मेळावा तयारीला वेग

म. ए. समिती मेळावा तयारीला वेग

Published On: Mar 10 2018 2:09AM | Last Updated: Mar 09 2018 9:29PMबेळगाव : प्रतिनिधी

संपूर्ण सीमाभागातील मराठी बांधवांचे लक्ष लागून राहिलेल्या 31 मार्चच्या मेळाव्याची जोमाने तयारी करण्यात येत आहे. आगामी काळात सीमाभाग पुन्हा म.ए. समितीच्या जागृती सभांनी ढवळून निघणार आहे. यामुळे कार्यकत्यार्ंमध्ये उत्साह पसरला आहे.

मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष खा. शरद पवार, डॉ.प्रा. एन. डी. पाटील उपस्थित राहणार आहेत. शरद पवार अनेक वर्षांनंंतर सीमाबांधवांशी संवाद साधणार आहेत. यामुळे सीमाबांधवांमध्ये नवी ऊर्जा निर्माण होणार आहे.

मेळावा यशस्वी करण्यासाठी ‘एक सीमावासी, लाख सीमावासी’चा  नारा देण्यात आला आहे. त्यानुसार जागृती कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. खानापूर म. ए. समितीच्यावतीने तालुक्यात जागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. बेळगाव तालुका म. ए. समितीच्यावतीने तालुक्यातील अनेक भागात युवा जागृती मेळावे घेण्यात आले आहेत. त्या माध्यमातून जागृतीची पहिली फेरी संपविण्यात आली आहे.

मेळाव्यासाठी किमान एक लाख सीमाबांधव एकवटण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. सभेसाठी सीपीएड मैदान, व्हॅक्सीन डेपो मैदान अथवा ज्योती महाविद्यालयाच्या मैदानाची चाचपणी करण्यात येत आहे. यासाठी आवश्यक परवानगी घेण्यासाठी प्रयत्न सुरू असून  दोन दिवसात मैदान निश्‍चित होईल.

मध्यवर्ती म. ए. समितीने सभा यशस्वी करण्यासाठी कंबर कसली असून प्रत्येक रविवारी सदस्यांची बैठक आयोजित करण्यात येत आहे. त्यावेळी आठवडाभरात करण्यात आलेल्या कार्यक्रमांची माहिती व नियोजन केले जात आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. 

जुने बेळगाव येथे 20 रोजी जागृती मेळावा होणार आहे. यामध्ये दक्षिण मतदारसंघातील कार्यकर्ते एकवटणार आहेत. सभा यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात येणार आहे. यादृष्टीने नियोजन सुरू असून बाईक रॅली, जागृती फेरीचे नियोजन केले आहे. यामध्ये युवा कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत.