Thu, Apr 25, 2019 23:27होमपेज › Belgaon › शाडू मूर्तिकारांसमोर पुन्हा ‘पीओपी’चे आव्हान!

शाडू मूर्तिकारांसमोर पुन्हा ‘पीओपी’चे आव्हान!

Published On: Jul 24 2018 1:07AM | Last Updated: Jul 23 2018 11:26PMखानापूर : राजू कुंभार

दोन वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या धर्तीवर कर्नाटकातही पीओपी गणेश मूर्तीवर बंदी घालण्यात आली. त्यामुळे गतवर्षी  पारंपरिक पध्दतीने शाडूच्या गणेशमूर्ती तयार करणार्‍या मूर्तिकारांना अच्छे दिन आले आहेत. मात्र, यंदा पुन्हा पीओपी गणेशमूर्ती  तालुक्यात येऊ लागल्याने शाडू मूर्तिकारांसमोर पीओपीचे आव्हान उभे राहिले आहे.

गणेश चतुर्थीच्या पार्श्‍वभूमीवर खानापूर शहरासह तालुक्यातील विश्रांतवाडी, फुलेवाडी (डुक्करवाडी), जांबोटी, बैलूर, गर्लगुंजी, तोपीनकट्टी, गणेबैल, निट्टूर-कुंभारवाडा, सिंगीनकोप, नंदगड, घोटगाळी, गोधोळी, गुंजी, लालवाडी, बीडी आदी गावांतील कुंभारशाळांमध्ये लगबग सुरू आहे. 

पारंपरिक पध्दतीने  गणेश मूर्ती  बनविणारे कलाकार शाडू आणि काळ्या मातीचा वापर करुन मूर्ती तयार करतात. पर्यावरण रक्षण आणि समतोल राखण्याच्यादृष्टीने ही परंपरा अशीच सुरू ठेवण्याची धडपड काही समाजसेवी संस्था करत आहेत. मात्र, अलिकडे वजनाने हलक्या, कमी खर्चात आणि सहज बनणार्‍या पीओपी मूर्ती घेण्याकडे कल वाढला. पीओपी  विरघळत नसल्याने विसर्जनस्थळी मूर्तींचा खच पडू लागला. तसेच पाणी, माती आणि जलचरांवर याचा विपरित परिणाम होण्याचा धोका वाढल्याने शासनाने पीओपीवर निर्बंध आणले.   मात्र, सध्या शासनाच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावत व्यावसायिकांनी पीओपी  मूर्ती  बाजारात आणल्या आहेत.

गेल्यावर्षी पर्यावरणप्रेमी तसेच हिंदुत्ववादी संघटनांकडून पीओपी मूर्तींवर निर्बंध आणण्याची  मागणी करण्यात आली. तसेच पर्यावरण खात्याकडे यासंदर्भातील तक्रारीही नोंदविण्यात आल्या. राज्य शासनाने याची दखल घेत गेल्या मार्चमध्ये पीओपी मूर्ती बंदीसंदर्भातील अध्यादेश  काढला. स्थानिक पातळीवर याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी ग्रा.पं. ना जनजागृती करण्यासंदर्भात आदेश देण्यात आले. मात्र, तालुक्यातील एकाही ग्रा.पं. ने कार्यवाही हाती घेण्याचे धाडस न केल्याने पीओपी मूर्ती पुन्हा घडू लागल्या आहेत. 

शाडू मूर्तिकार अनुदानापासून वंचित
शाडू मूर्तिकारांना सरकारने अनुदान द्यावे, अशी मागणी येथील क्रांतिसनेचे अध्यक्ष महादेव मरगाळे यांनी शासनाकडे केली होती.  मात्र, अद्यापही मूर्तिकारांचा विचार झालेला नाही.  

शाडूच्या रंगाची पीओपी मूर्ती

पीओपीमध्ये किन्नूरची लाल माती मिसळून शाडूची मूर्ती असल्याचे दाखविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी पारखून मूर्ती खरेदी करण्याची गरज आहे. तसेच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करुन शाडूच्या नावाखाली पीओपीचा काळा बाजार रोखण्याची नितांत गरज आहे.