Thu, Apr 25, 2019 05:26होमपेज › Belgaon › ब्राऊन शुगरची विक्री करणारी टोळी जेरबंद

ब्राऊन शुगरची विक्री करणारी टोळी जेरबंद

Published On: Jan 12 2018 1:51AM | Last Updated: Jan 12 2018 12:08AM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव शहर परिसरात अंमली पदार्थाची अनिर्बंध विक्री होत असल्याचे उघडकीस आले आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईअंतर्गत अडीच लाख किमतीची ब्राऊन शुगरची 450 पाकिटे जप्‍त केली असून, 13 जणांना अटक करण्यात आली आहे.  त्यात मुंबईच्या एका महिलेचा समावेश आहे, अशी माहिती बेळगाव पोलिस आयुक्‍त डी. सी. राजप्पा यांनी दिली.

पत्रकारांना माहिती देताना राजाप्पा म्हणाले, शहर गुन्हे अन्वेषण विभागाला ब्राऊनशुगर विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिस निरीक्षक ए. एस. गोदीकोप्प व सहकार्‍यांनी सापळा रचून मंगळवारी सायंकाळी राष्ट्रीय महामार्गाजवळील हिंडाल्को चौकाजवळ दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी बेळगावातील ब्राऊनशुगर प्रकरणाची माहिती दिली. त्याआधारे अन्य 11 जणांना अटक केली. 

अटक केलेल्यांची नावे यशीन हसन सनदी (वय 24, रा. आझादनगर), सूरज शिवाजी शिंदे (39, रा. सदाशिवनगर), शाकीर निझामी (19, रा. उज्ज्वलनगर), परवेज अंडेवाले (19, रा. घी गल्ली), सलीम मकानदार (27, रा. सदाशिवनगर), युवराज सुनील सरनोबत (27, रा. कंग्राळगल्ली), शाहबाज बाळेकुंद्री (19, रा. चिरागनगर), अय्याज मुल्ला (20, रा. उज्ज्वलनगर), तरबेज देसाई (19, रा. खंजरगल्ली), वसीम दलवाई (29, रा. शाहूनगर), अतीश अनिल सावंत (24, रा. शिवाजीनगर), शोधन सुरेश हुंदरे (24, रा. समृद्धी कॉलनी, गणेशपूर), कुतुबुद्दीन अल्ताफ बाळेकुंद्री (22,  रा. न्यू गांधीनगर) व सुशीला पोण्णस्वामी (40, रा. जे. पी. नगर सायन, मुंंबई) अशी आहेत.

तस्करीचे मुंबई कनेक्शन

बेळगाव : प्रतिनिधी सुशिला मुंबईमधून बेळगावला ब्राऊनशुगर पाठवत असे. यासिन व सूरज हे मुंबईहून ती आणत होते.  उर्वरित संशयित 300 रु. प्रतिग्रॅमप्रमाणे ब्राऊनशुगरची विक्री कॉलेज युवक तसेच समाजकंटकांना करीत होते.  बेळगावातील 12 जणांकडून 1 लाख 35 हजार रु. ची तर मुंबईच्या सुशिला पोण्णस्वामीकडून 1 लाख 15 हजार रु. किंमतीच्या 350 ब्राऊनशुगरची पाकिटे जप्त करण्यात आली आहे. संशयितांची सखोल चौकशी सुरू आहे, असेही राजाप्पा यांनी स्पष्ट केले. पोलिस उपायुक्त सीमा लाटकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.