Tue, Jul 23, 2019 18:49होमपेज › Belgaon › शाळा सोडल्यास पोलिसमामा येणार घरी !  

शाळा सोडल्यास पोलिसमामा येणार घरी !  

Published On: Jan 19 2018 1:49AM | Last Updated: Jan 19 2018 12:16AMबेळगाव : प्रतिनिधी

शिक्षण पूर्ण करण्यापूर्वी मुलाने शाळा सोडली तर त्याची चौकशी करून पुन्हा त्याला शाळेत नेण्यासाठी चक्‍क पोलिसमामा घरापर्यंत येणार आहेत. तसेच  पुन्हा शाळेत दाखल करण्याचे काम पोलिस करणार आहेत. अर्धवट शिक्षण सोडून अंमली पदार्थ तसेच गुन्हेगारीमध्ये अल्पवयीनांचा सहभाग वाढत चालला आहे. त्यासाठी ही महत्त्वाकांक्षी योजना प्रथम प्रायोगिक तत्त्वावर बेळगाव व विजापूर जिल्ह्यांत राबविली जाणार असल्याचे बेळगाव उत्तर विभागाचे पोलिस महानिरीक्षक अलोककुमार यांनी सांगितले.

‘अक्षरासाठी आता पोलिस’ ही योजना केवळ कर्नाटकात नव्हे तर संपूर्ण देशातच प्रथम बेळगाव व विजापूर जिल्ह्यांत राबविली जाणार आहे. मुलाने शाळा सोडली तर त्यांच्या चौकशीसाठी शिक्षक घरापर्यंत जातात ही आतापर्यंतची शिक्षण खात्याची पद्धत आहे. परंतु, आता शिक्षकाबरोबर पोलिसही शाळा सोडलेल्या मुलाच्या घरी जाऊन पुन्हा त्याला शाळेत दाखल करणार आहेत. या योजनेनुसार सर्वांना शिक्षित बनविण्यात आले तर समाजातील गुन्हेगारी प्रवृत्ती मोडून काढण्याचा उद्देश या योजनेमागे असल्याचे आयजीपी अलोककुमार यांनी सांगितले.

शाळा सोडलेल्या मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची पद्धत शिक्षण खात्यात कार्यरत आहे. शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी शाळा सोडलेल्या मुलांची यादी शिक्षकांकडे   असते. दारिद्य्र, उद्योग, व्यवसाय, बाजाराला जाणे आदी कारणामुळे मुले शाळेला जाण्याचे बंद करतात. अशी मुले गुन्हेागारीकडे वळतात. त्याशिवाय जातीयवादी शक्‍ती त्या मुलांचा वापर करून त्यांना दुष्कृत्ये करण्यास भाग पाडतात. असे प्रकार अनेक आढळून आले आहेत. 

याप्रकारे अल्पवयीन व शाळा सोडलेल्या मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढविण्याचे काम केले जाते. त्याचा गंभीर परिणाम त्या मुलांच्या भवितव्यावर होतो. हे टाळण्याच्या द‍ृष्टीनेच पोलिस खात्याच्या वतीने आपण ही योजना राबविण्याचा संकल्प केला असल्याचे आयजीपी अलोककुमार यांनी सांगितले. 

‘अक्षरासाठी पोलिस’ असे त्या योजनेला नाव दिलेे आहे. बीट -व्यवस्थेमधील पोलिस कॉन्स्टेबल किंवा हेडकॉन्स्टेबल यांच्यावर ही योजना सोपवली आहे. शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होतो. त्यावेळी शिक्षक त्यांच्याकडे शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांची यादी देतील. ते पोलिस शिक्षकांसमवेत त्या मुलाच्या घरी सकाळी जातील व त्याला पटवून सांगून जीपमधून शाळेला दाखल करून येतील या योजनेवर पोलिस निरीक्षक किंवा फौजदार यांचे लक्ष राहणार आहे.