Mon, Nov 19, 2018 13:14होमपेज › Belgaon › सौंदलगा रेणुका देवी यात्रा उत्साहात

सौंदलगा रेणुका देवी यात्रा उत्साहात

Published On: Mar 07 2018 12:41AM | Last Updated: Mar 07 2018 12:23AMसौंदलगा : वार्ताहर

जागृत देवस्थान रेणुका देवीची भंडारा यात्रा 6 रोजी अमाप उत्साहात पार पडली. विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. 5 रोजी रात्रीपासूनच यात्रेचा प्रारंभ झाला.  6 रोजी रात्री देवीच्या गाण्यांबरोबर भजनी मंडळातर्फे रात्री जागर कार्यक्रम पार पडला.

पहाटेपासून शेकडो भाविकांनी देवीस दंडवत घातला. यंदा पूजेचा मान आप्पासाहेब गणपती पाटील (गलगले) यांच्याकडे होता. त्यांच्या उपस्थितीत पुजारी चंद्रकांत कुर्ले यांनी  सकाळी 8 वाजता धार्मिक कार्यक्रम झाल्यावर देवीस अभिषेक  घालून महापूजा केली. दुपारी एक वाजता कोतवालाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. देवीचा घोडा, मानकरी, छबिना याचा सहभाग होता. यावेळी उदं गं आई उदंच्या जयघोष मंदिर परिसरात घुमला. प्रदक्षिणेनंतर दुपारी 1.30 वाजता देवीची आरती  करण्यात आली.

मानाचे कोतवाल (घोडे) पाटील यांनी नैवेद्याची रास फोडून भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. पहाटे 5 वाजता देवीच्या आरतीने यात्रेची सांगता झाली. सकाळपासून बेळगाव, कोल्हापूरसह कोकण भागातून हजारो भाविकांनी गर्दी केली होती. यात्रेला कूर, कौलव, भोगावती भागातील भाविक बैलगाडीने येण्याची परंपरा आहे. 100 हून अधिक बैलगाड्या दाखल झाल्या होत्या. यात्रेनिमित्त मंदिर परिसरातील मेवा-मिठाई दुकाने, लहान मोठे पाळणे, कलिंगड, सरबत, आइस्क्रीम व हॉटेलचे स्टॉल होते. खेळणी व बांगड्यांची दुकाने होती. यात्रा  सुरळीत पार पडण्यासाठी ग्रा.पं. पदाधिकारी, यात्राकमिटी सदस्य, मंगलमूर्ती  मंडळाचे कार्यकर्ते, स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले. ग्रामीण ठाण्याचे फौजदार निंगनगौडा पाटील  व सहकार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.