होमपेज › Belgaon › पहिला निकाल सौंदत्ती, शेवटचा खानापूर 

पहिला निकाल सौंदत्ती, शेवटचा खानापूर 

Published On: May 16 2018 1:39AM | Last Updated: May 16 2018 12:23AMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघामधील मतमोजणी मंगळवारी आरपीडी कॉलेजमध्ये पार पडली. जिल्ह्यातील पहिला निकाल सौंदत्ती मतदारसंघाचा तर शेवटचा निकाल खानापूर मतदारसंघाचा जाहीर झाला. मतमोजणी केंद्राबाहेर सकाळपासून उमेदवारांच्या समर्थकांनी गर्दी केली होती. 

सौंदत्ती मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आनंद मामनी विजयी झाले. सकाळी 11.30 च्या सुमारास पहिला निकाल जाहीर झाला. त्यांना 62480 मते मिळाली. त्यांचे प्र्रतिस्पर्धी आनंद चोप्रा यांना 56,189 मते मिळाली. 

जिल्ह्यातील शेवटचा निकाल खानापूर मतदारसंघाचा जाहीर करण्यात आला. या मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार अंजली निंबाळकर विजयी झाल्या. त्यांना 36,649  मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे विठ्ठल हलगेकर यांना 31516 मते मिळाली. 

प्रत्येक उमेदवार आणि समर्थक आपल्या मतदारसंघातील निकाल कधी जाहीर होणार, याकडे लक्ष देऊन होते. समर्थकांनी मतमोजणी केंद्राबाहेर मोठी गर्दी केली होती. मात्र बाहेर निकाल समजण्यास उशीर होत होता. त्यामुळे प्रत्येकजण कोण विजयी झाले, कोणाला किती मते मिळाली, अशी विचारणा करत असल्याचे चित्र दिसून येत होते. 

विजयी उमेदवारांची नावे समजण्यास विलंब होत असल्यामुळे कार्यकर्त्यांची धाकधूक  वाढली होती. जसजसा निकाल जाहीर करण्यात येत होता. तसे विजयी उमेदवारांचे समर्थक जल्‍लोष करताना दिसत होते. उमदेवारांच्या विजयाच्या घोषणा देण्यात येते होत्या.  बेळगाव जिल्ह्यातील सर्वात शेवटचा निकाल खानापूर मतदारसंघाचा जाहीर झाला. त्यामुळे खानापूर मतदारसंघातील उमेदवार आणि समर्थकांची घालेमल वाढली होती. सुमारे अडिचच्या सुमारस या मतदारसंघातील निकाल जाहीर करण्यात आला. 

सर्व 18 मतदारसंघाची मतमोजणी एकाच ठिकाणी
जिल्ह्यातील सर्व 18 मतदारसंघाची मतमोजणी एकाच ठिकाणी आरपीडी कॉलेजमध्ये पार पडली. सकाळी आठपासून मतमोजणीला सुरूवात झाली.  मतमोजणी केंद्राबाहेर सर्वच उमेदवारांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. पहिला निकाल कोणता जाहीर होतो. याकडे सर्वांचे कान लागले होते. सकाळी साडेअकराच्या सुमारास पहिला निकाल जाहीर झाल्यानंतर इतर मतदारसंघाचेही निकाल थोड्याथोड्या अंतराने जाहीर करण्यात आले.