होमपेज › Belgaon › चिकोडी परिसरात मटका तेजीत

चिकोडी परिसरात मटका तेजीत

Published On: May 15 2018 1:36AM | Last Updated: May 14 2018 9:02PMचिकोडी : काशिनाथ सुळकुडे

अनेक कुंटुंबाची होणारी राखरांगोळी रोखण्यासाठी कर्नाटक सरकारने राज्यात लॉटरीवर बंदी  घातली. मटक्यावर तर आधीपासूनच बंदी आहे. पण, सीमाभागात मटका व्यवहारात मोठी उलाढाल होत असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.  

घरी हलाखीच्या परिस्थितीने पत्नी, मुलांवर उपासमारीची वेळ असताना राबून आलेली मजुरी दारु-मटका जुगारांसारख्या व्यसनावर खर्च होते. यामुळे अशा व्यसनांना आळा घालण्यासाठी सरकारने अनेक पाउले उचलली, पण प्रशासकीय यंत्रणेच्या ढिसाळपणामुळे सकारात्मक परिणाम दिसलेला नाही.

चिकोडी, अथणी, हुक्केरी, गोकाक, रायबाग तालुक्यांसह संपूर्ण सीमाभागातील गावांमध्ये बेकायदेशीर धंद्यांना जोर आला आहे. यात मटका धंदा दिवसेंदिवस आपली मुळे मजबूत करीत असल्याचे दिसून येत आहे. मटका व्यवसायाचे सूत्रधार शेजारच्या महाराष्ट्रातील मिरज व इचलकरंजी शहरात बसून हा धंदा चालवत असल्याची जाणकारांची माहिती आहे.  सीमाभागातील प्रत्येक गांवात मटका हा व्यवसाय चालतो. त्यामुळे सीमाभागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. पोलिस खात्याने मटका व्यवसायाची पाळेमूळ खोदून काढण्याची गरज आहे. तर ज्येष्ठांनी मटका, जुगारसारख्या व्यसनांविषयी मुलांच्यात जागृती करणे गरजेचे आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

ओपन-क्‍लोजच्या आहारी 

मटका म्हणजे आकड्यांचा खेळ-हिशोब असल्याचे  लोक  म्हणतात. पण ज्या लोकांना वाचता-लिहता येत नाही, असे लोकदेखील राबून कमावलेले पैसे ओपन-क्‍लोज धंद्यात गुंतवण्याचा आणि 1 रुपया गुंतवून 80-90 रुपये मिळवण्याचा प्रयत्न  करतात. या नादात घरदार गमाविल्याची अनेक उदाहरणे आहेत. 

एसएमएस, व्हॉटसअपचा वापर 

पूर्वी एका चिठीवर चालणारा धंदा अलिकडच्या काळात कमी झाल्याचे पहावयास मिळतेे. कारण एसएमएस, व्हॉटसअ‍ॅपच्या माध्यमातून मटका बुकींनी पोलिसांना चकवा देत आपले व्यवहार बिनधास्त सुरू ठेवले आहेत.

तरुणपिढी बरबाद 

प्रारंभी कमी श्रम,  पैशात लवकर  श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी तरुण वर्ग मटका व जुगाराच्या आहारी गेल्याचे दिसून येते. दिवसभर उन्हात परिश्रम करायचे अन आलेली मजुरी सायंकाळी मटका जुगारात उडवायची हे जणू व्यसनच लागले आहे.