Fri, Mar 22, 2019 01:51
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › अल्प वेतन,तेही मिळतेय विलंबाने!

अल्प वेतन,तेही मिळतेय विलंबाने!

Published On: Dec 26 2017 1:32AM | Last Updated: Dec 25 2017 11:39PM

बुकमार्क करा

बेळगाव : संदीप तारिहाळकर

राज्यातील एकूण 412 उच्च महाविद्यालयांत रिक्त असणार्‍या प्राध्यापकांच्या जागा भरण्यासाठी राज्य सरकारने 13 हजार अतिथी प्राध्यापक म्हणून तात्पुरत्या सेवेत घेतले. पण गेली अनेक वर्षे अल्प वेतनावर त्यांची बोळवण सुरू आहे. या प्राध्यापकांना केवळ महिन्याकाठी 11 ते 13 हजार पयंर्ंतच वेतन देण्यात येते.  तेही तीन-चार महिने उशिरा होते. गुजरात राज्यात अतिथी प्राध्यापकांना 40 हजार रुपये वेतन मिळते तर कर्नाटकात केवळ 13 हजार रुपये दिले जाते. 

अतिथी प्राध्यापकांना कायम सेवेत घेण्यासह त्यांना गुजरात राज्याच्या धर्तीवर वेतन मिळावे, यासाठी कर्नाटक राज्य प्रथम दर्जा अतिथी प्राध्यापक संघातर्फे राज्य शासनाकडे वारंवार मोर्चे, निवेदनाद्वारे दाद मागत आहे. मात्र आजपयंर्ंत त्यांच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. तत्कालीन उच्चशिक्षणमंत्री आर. व्ही. देशपांडे व विद्यमान उच्च शिक्षणमंत्री रायरेड्डी यांच्याही गाठीभेटी घेतल्या. मात्र आजपयंर्ंत आश्‍वासनाशिवाय काहीच होत नाही. याउलट दरम्यानच्या काळात ज्या ज्या अतिथी प्राध्यापकांना दहा वर्षे पूर्ण झाली अशा अतिथी प्राध्यापकांना कामावरून कमी करण्यात आले आहे. त्यांची संख्या पाच हजारावर आहे. 

सरकारच्या या धोरणामुळे या प्राध्यापकांची आर्थिक पिळवणूक होत आहे. कायम सेवेत असणार्‍या आणि अतिथी म्हणून सेवेत असणार्‍या प्राध्यापकांचे काम सारखेच, मात्र वेतनात 30 ते 40 हजार रुपयांचा फरक केला जातोय.  

जिल्ह्यात 600 वर अतिथी प्राध्यापक असून राज्यभरात हीच संख्या 13 हजारावर आहे. या सार्‍यांना आपल्या चरितार्थासाठी उसणवार करावी लागत आहे. तुटपुंज्या वेतनामुळे सकाळच्या सत्रात प्राध्यापक म्हणून काम करणारे दुपारनंतर कोणत्या संस्थेमध्ये कामगार म्हणून कार्यरत आहेत. या सार्‍या प्रकारात युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनने (युजीसी) लक्ष घालून उच्च शिक्षणाचा दर्जा उंचवावा, असे मत शिक्षणप्रेमीतून व्यक्त होत आहे. या विविध मागण्यांसाठी संघाचे जिल्हाध्यक्ष राजू कंबार, राज्य प्रधान सचिव विठ्ठल माळवदे, जिल्हा सचिव प्रकाश मावनूर, जयश्री हंचीमनी, उमेश भीमनायक आदी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करत आहेत.