Fri, Apr 26, 2019 01:21होमपेज › Belgaon › सकल मराठा समाज बैठक :आमदार-खासदारांची भेट घेणार

सकल मराठा समाज बैठक :आमदार-खासदारांची भेट घेणार

Published On: Jul 31 2018 1:30AM | Last Updated: Jul 30 2018 11:31PMखानापूर : प्रतिनिधी

ज्या लोकप्रतिनिधींच्या क्षेत्रामध्ये मराठा समाजाचे अधिक प्राबल्य आहे. तेथील मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची त्या सर्व लोकप्रतिनिधींची नैतिक जबाबदारी आहे. आगामी लोकसभा निवडणुकीआधी राज्यातील मराठा समाजाचा 2 अ वर्ग प्रवर्गात समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी मराठाबहुल भागातील सर्वपक्षीय आमदार व खासदारांची भेट घेण्याचा निर्णय खानापुरातील सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला.

शिवस्मारकातील माजी आ. व्ही. वाय. चव्हाण सभागृहात सकल मराठा समाजाच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करुन आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. लोकप्रतिनिधींना प्रश्‍नाची धग कळावी यासाठी भेट घेऊन निवेदन दिले जाणार आहे.

बेळगाव जिल्ह्यासह कारवार, धारवाड, बिदर, विजापूर या भागात मराठा समाजाचे लक्षणीय लोकबळ आहे. मात्र असंघटितपणामुळे मराठा समाजाला हक्काच्या आरक्षणापासून वंचित राहावे लागले आहे. आगामी काळात आरक्षणाचा लढा यशस्वी करण्याबरोबरच तालुक्यातील मराठा बांधवांच्या समस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भक्कम संघटन उभारण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
पक्ष, राजकारणविरहित मराठ्यांची संघटना उभी करुन समाज विकासाला हातभार लावणारे उपक्रम हाती घेण्यावर भर देण्याचे ठरविण्यात आले. 100 जणांची तालुका कार्यकारिणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याद्वारे तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत, विधवा व गरीब कुटुंबांना सहाय्य करण्यात येणार आहे.

तालुक्यातील वाळू व्यवसायावर अवलंबून असलेला बहुतांश समाज मराठा आहे. कडक निर्बंध आणि पोलिसी कारवाईचा बडगा यामुळे तरुणांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. याबाबत कायदेशीर पाठपुरावा करण्यासाठी कृती समितीची रचना करण्याची सूचना मांडण्यात आली.यावेळी विठ्ठल हलगेकर, संजय कुबल, दिलीप पवार, मुरलीधर पाटील, यशवंथ बिर्जे, विलास बेळगावकर, प्रकाश चव्हाण, के. पी. पाटील, नारायण कापोलकर आदी उपस्थित होते.

मराठा बॅनरखाली एकत्र येण्याचे आवाहन

पक्ष व विचारभिन्नता बाजूला ठेवून केवळ मराठा या एकाच बॅनरखाली एकत्रित येण्याचे आवाहन दिलीप पवार यांनी केले. पक्ष व संघटना बाजूला ठेवून आधी तरुण पिढीच्या रोजीरोटीच्या प्रश्‍नांना भिडूया. आरक्षणासाठी आज एल्गार न पुकारता थंड राहिल्यास भावी पिढी आम्हाला माफ करणार नाही, असे ते म्हणाले.