Sat, Apr 20, 2019 16:01होमपेज › Belgaon › आरटीओ चौकातील अपघात खड्ड्यामुळे

आरटीओ चौकातील अपघात खड्ड्यामुळे

Published On: Feb 06 2018 10:57PM | Last Updated: Feb 06 2018 10:55PMबेळगाव : प्रतिनिधी

आरटीओ सर्कलजवळ भला मोठा खड्डा खणून ठेवल्यामुळे सोमवारी इनायत शेख या तरूणाचा बळी गेला. त्याबद्दल भूमिगत वीजवाहिनी योजनेचे कामकाज करणार्‍या कंत्राटी कंपनीवर एफआयआर दाखल करण्याचा ठराव आज महापालिकेच्या सर्वसाधारण बठकीत करण्यात आला.

अध्यक्षस्थानी महापौर संज्योत बांदेकर होत्या. बळी गेलेल्या तरूणाच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्यात यावी. असा निर्णय ही महापौर संज्योत बांदेकर यांनी जाहीर केला. सदर खड्डा गेल्या सहा महिन्यापासून बुजविण्याची मागणी आपण सदर कंपनीकडे करीत होते. परंतु खड्डा बुजविण्याकडे सदर कंपनीने दुर्लक्ष केल्यामुळेच त्या तरूणाचा बळी गेल्याची तक्रार नगरसेविका मीनाक्षी चिगरे यांनी सभागृहात केली. 

दोन वर्षांपासून बेळगाव शहर व्याप्‍तीमध्ये 380 कोटी खर्चाची भूमिगत वीजवाहिनी योजना राबविण्यात येत आहे. त्या योजनेमुळे शहरातील जलवाहिन्या भुयारी गटारी योजना व रस्त्यांची वाताहत झाली आहे. त्याबद्दलचा कर हेस्कॉमकडून वसूल करण्यासाठी बंगळुरला नगरविकास खात्याच्या सचिवाकडे मनपा सभागृहाचे शिष्टमंडळ घेऊन जाण्याचा  एकमुखी ठरावही  आजच्या बैठकीमध्ये झाला.

नगरसेवक पंढरी परब व किरण सायनाक यांनी भूमिगत वीजवाहिनी योजनेमुळे शहरातील रस्त्यांची जलवाहिन्यांची व भुयारी गटारी योजनेंची वाताहत झाली, अशी तक्रार मांडली. ते म्हणाले, बंगळूर मनपाला विद्युत केबल घालणारी कंपनी स्वत:हून रस्ते खोदाई केल्याबद्दल  सरकारच्या मार्गसुचीनूसार पैशाची भरणा करते.  परंतु बेळगाव येथे हेस्कॉमने भूमिगत वीजवाहिनी योजनेबद्दल मनपाबरोबर कोणताही करार किंवा परवानगी घेण्यापूर्वीच बेळगाव शहरामध्ये काम चालू केलेले आहे. आता गॅस पुरवठा योजनेचे कामकाजही हाती घेण्यात आले असून गॅसवाहिनीसाठीही मनपाची परवानगी घेतली नसल्याचे अधिकारी सांगत आहेत. मनपाने हेस्कॉमकडून व गॅस कंपनीकडून रितसर कर वसूल करावा त्यावर आयुक्‍त शशिधर कुरेर म्हणाले, मनपाने त्या खोदाईसाठी 180 रू.चा दर निश्‍चित केला असून  मनपाला हेस्कॉमकडून 17 कोटी 81 लाख रू.चा कर मिळेल. 

सेठ-सायनाक चकमक

यावेळी आ.फिरोज सेठ हे बोर्डिंगवरील कराबद्दल बोलत होते. तर किरण सायनाक हे वीजवाहिनी कराबद्दल बोलत होते. त्यावेळी किरण सायनाक यानी आमदारांना विषयावर बोलण्याची सूचना केली. त्यावेळी त्या दोघांमध्ये शब्दीक चकमक उडाली. 

आयुक्‍त शशिधर कुरेर यानी विद्युत केबल घातल्याबद्दल नियमानुसारच कर वसुल केला जाईल. ती योजनाही सरकारी असल्याने नियमानुसारच काम करावे लागते, असे स्पष्ट केले. शहर अभियंता आर.एस.नायक यांनी विद्युत केबलबद्दल 100 रू.प्रमाणे प्रशासकाने दर ठरविला होता. तो दर आता 180 रू.पर्यंत वाढवून घेण्यात आला असल्याचे सांगितले. 

महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते दौलत गोडसे व मनपाचे आरोग्य निरीक्षक विलास देवरवाडी (56) यांचे निधन झाल्याबद्दल त्यांना मनपातर्फे श्रध्दांजली वाहण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.