Tue, Apr 23, 2019 20:16होमपेज › Belgaon › तालुक्यात दिवसा थ्रीफेज वीजपुरवठा करा

तालुक्यात दिवसा थ्रीफेज वीजपुरवठा करा

Published On: Dec 29 2017 1:35AM | Last Updated: Dec 28 2017 11:47PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये अनियमित वीजपुरवठा केला जात आहे. यामुळे शेतकरी, विद्यार्थी, उद्योजक आणि लघु उद्योजकांना याचा  त्रास सहन करावा लागत आहे.  सर्वसामान्यांच्या दैनंदिन व्यवहारावर परिणाम होत आहे. यासाठी ग्रामीण भागात दिवसा 8 तास थ्रीफेज वीजपुरवठा करावा, यासह विविध समस्यांचे त्वरित निवारण करण्यात यावे, अशी मागणी करून तालुका मराठी नेत्यांकडून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. 

सध्या रब्बी हंगामातील पिके घेतली जात आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना पिकांना पाणी देण्यासाठी नियमित वीजपुरठा करणे आवश्यक आहे. मात्र हेस्कॉमकडून दिवसाऐवजी रात्री थ्रीफेज पुरवठा केला जात आहे. शेतकर्‍यांची गैरसोय होत आहे. रात्री पिकांना पाणी देणे अशक्य आहे. जंगली जनावरांच्या हल्ल्यासह सर्पदंशाच्या घटना घडत आहेत. याला हेस्कॉमचा अंधाधुंद कारभार जबाबदार आहे. यासाठी दिवसा 8 तास थ्रीफेज वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. 

तालुक्यातील अनेक गावांचे महत्त्वाचे संपर्करस्ते उखडून चाळण झाली आहे. सदर रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने ग्रामीण जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

बळ्ळारी नाल्यातील पाणी शेजारी असणार्‍या शेतकर्‍यांच्या शेतवडीत शिरत असल्याने पिकांचे नुकसान सोसावे लागत आहे. बळ्ळारी नाल्याच्या पाण्याच्या निचर्‍यासाठी योग्य नियोजन करण्याची मागणी 2012 पासून करण्यात येत आहे. मात्र  याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.  नाल्याचा विकास करण्यात यावा, शेतकर्‍यांचे होणारे नुकसान टाळावे, अशी मागणी मांडण्यात आली. 

बेळगुंदी येथे विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदानाची आवश्यकता असून यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. याची पूर्तता करण्यात आलेली नाही. सदर प्रकरण त्वरित निकालात काढण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली.

बसुर्ते व बेळगुंदी बससेवेबाबतही निवेदन देण्यात आले. बसुर्ते बस सुरू करण्याबरोबर बेळगुंदी बस सोनोलीपर्यंत सोडण्याची ग्वाही अधिकार्‍यांनी दिली. वाय. बी. चौगुले, मनोज पावशे, ता. पं. सदस्य  सुनील अष्टेकर, आप्पा बेळगावकर आदी कार्यकर्ते संख्येने उपस्थित होते.