होमपेज › Belgaon › बेळगाव-गोवा मार्गावर दरोडा

बेळगाव-गोवा मार्गावर दरोडा

Published On: Jun 22 2018 2:09AM | Last Updated: Jun 22 2018 12:19AMखानापूर : वार्ताहर

बेळगाव-पणजी महामार्गावरील होनकल क्रॉसवर (ता. खानापूर) गुरुवारी मध्यरात्रीनंतर 3 च्या सुमारास गोव्याहून बेळगावला जाणार्‍या चारचाकी वाहनावर सशस्त्र दरोडा घालण्यात आला. दरोडेखोरांनी बंदूक आणि चाकूचा धाक दाखवून वाहनातील चार तोळ्यांची सोन्याची साखळी आणि दोन लाख रुपये लुटले. 

रात्री एकच्या सुमारास नितीन एम. एस. (रा. गोवा) हे आपल्या चारचाकी वाहनातून दोन सहकार्‍यांसह रामनगरमार्गे गोव्याहून बेळगावच्या दिशेने निघाले होते. होनकल क्रॉसजवळ येताच  पाठलाग करत आलेल्या तिघांनी पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून डाव्या बाजूच्या दरवाजाची काच फोडली आणि नितीन यांच्या गळ्यातील चार तोळ्यांची साखळी आणि गाडीतील 2 लाख रुपये काढून घेतले. त्यानंतर त्यांनी पुन्हा गोव्याच्या दिशेने पलायन केले. 

नितीन यांनी पहाटे खानापूर पोलिस स्थानकात यासंदर्भात तक्रार केली. प्राथमिक तपासात दरोडेखोर हे इनोव्हा गाडीतून आले होते आणि त्यातील प्रमुख संशयित हा केरळमधील वाँटेड असून सध्या गोवा आणि सीमावर्ती भागात त्याचे वास्तव्य आहे, अशी माहिती उघड झाली आहे. 

पीएसआय होसमणी यांनी गोवा, कारवार आणि महाराष्ट्राच्या हद्दीतील सीमावर्ती भागातील सर्व पोलिस स्थानकांना दरोड्याची माहिती दिली आहे. गुरुवारी सकाळी अतिरिक्‍त जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. शेखर ठक्‍कन्‍नावर, सीपीआय आय.एस. गुरुनाथ आणि पीएसआय संगमेश होसमणी यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला.