होमपेज › Belgaon › शहरातील रस्तेे, अडथळ्यांची शर्यत

शहरातील रस्तेे, अडथळ्यांची शर्यत

Published On: Jul 11 2018 1:35AM | Last Updated: Jul 10 2018 8:52PMबेळगाव : प्रतिनिधी

शहरातील रस्ते म्हणजे अडथळ्याची शर्यत बनले आहेत. रस्त्यातून करण्यात आलेली खोदाई, पार्क केलेली वाहने, वीज खांब, ट्रान्स्फॉर्मर, फेरीवाल्यांचे अतिक्रमण व दुकानदारांची दादागिरी यामुळे शहरातून प्रवास म्हणजे दिव्य ठरत आहे. याकडे वाहतूक पोलिस व मनपाने दुर्लक्ष झाले आहे.

बेळगावची वाटचाल झपाट्याने स्मार्ट सिटीकडे होत आहे. कोट्यवधी रुपये खर्चून अत्याधुनिक सुविधा नागरिकांना देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत आहे. परंतु, रस्त्यावरच्या अडथळ्यामुळे हाच काय विकास म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

शहरातील प्रमुख भाग म्हणून गणपत गल्ली, खडेबाजार, मारुती गल्ली, कडोलकर गल्ली, किर्लोस्कर रोड, समादेवी गल्ली, पांगुळ गल्ली, रविवार पेठ, कलमठ रोड, कोर्ट आवार, चव्हाट गल्ली हा परिसर ओळखला जातो. यामुळे हे मार्ग नेहमीच गजबजलेले असतात. परंतु, रस्त्यावरच अनेक अडथळे निर्माण झाल्याने या भागातून वाहने हाकताना कसरत करावी लागत आहे.

बाजारपेठेत फेरीवाल्यांचे भर रस्त्यात अतिक्रमण झाले आहे. काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी फेरीवाल्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, यानंतर फेरीवाल्यांनी अतिक्रमण करून वाहतुकीला अडथळा आणण्याचा प्रयत्न चालूच ठेवला आहे. काही व्यापार्‍यांनी दुकानासमोर वाहने लावू नयेत, यासाठी लाकडी फळी वा लोखंडी अडथळा टाकून जागा अडविण्याचा प्रकार चालविला आहे. यामुळे बाजारात येणार्‍यांना वाहने लावायची कोठे, हा प्रश्‍न सतावत आहे.

मुख्य रस्त्यावर वेगवेगळ्या मोबाईल कंपन्या, भूमिगत वीजवाहिन्या, टेलिफोन खाते यांच्याकडून वारंवार खोदाई करण्यात येते. यामुळे रस्ते भकास बनत चालले आहेत. पावसाच्या पाण्यामुळे चिखल निर्माण होऊन त्याचा फटका वाहनधारकांना बसत आहे.

भूमिगत वीजवाहिन्या व गॅसलाईन घालण्याचे काम सध्या जोमाने सुरू आहेत. यासाठी सातत्याने खोदाई सत्र सुरू आहे. रस्त्याच्या मध्येच ट्रान्स्फॉर्मर उभारण्यात येत आहेत. ते वाहनचालकांना अडचणीचे ठरत आहेत. यावर उपाय योजण्याची गरज आहे. वाहतूक पोलिसा केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत.