Fri, Apr 19, 2019 12:26होमपेज › Belgaon › ‘चिकोडी’तील नद्यांच्या पातळीत पुन्हा वाढ

‘चिकोडी’तील नद्यांच्या पातळीत पुन्हा वाढ

Published On: Jul 18 2018 1:53AM | Last Updated: Jul 18 2018 12:43AMबेळगाव : प्रतिनिधी

पश्‍चिम महाराष्ट्रासह कोकणात मुसळधार पाऊस सुरु असून तालुक्यातून वाहणार्‍या  कृष्णा, दूधगंगा व वेदगंगेच्या नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. यामुळे तालुक्यातील अद्यापही 6 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.  दूधगंगा नदीवरील सदलगा-बोरगाव दरम्यानच्या नवा पुलाला पाणी येऊन लागले असून रात्री हा पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.

गेल्या पंधरा दिवसापासून पश्‍चिम महाराष्ट्र, कोकणात होत असलेली पावसाची संततधार अद्यापही सुरु आहे. यामुळे नद्यांच्या पातळीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.  महाराष्ट्रातून कृष्णा नदीला 1 लाख 44 हजार 928 क्युसेक पाणी वाहून येत आहे. यात शिरोळ तालुक्यातून राजापूर बंधार्‍यातून 1 लाख 19 हजार 232 क्युसेक व दूधगंगा नदीतून 25 हजार 696 क्युसेक पाण्याचा विसर्ग तालुक्यातील नद्यांना होत आहे.  महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून येत असल्यामुळे तालुक्यासह अथणी, जमखंडी तालुक्यातील नदी काठावर पूरस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. यामुळे तालुका व जिल्हा प्रशासन व जलसंपदा खात्याने महाराष्ट्रातील अधिकार्‍यांच्या संपर्कात राहून लक्ष ठेवून आहेत. तसेच महाराष्ट्रातून येणार्‍या पाण्याच्या प्रमाणा इतकेच पाणी  हिप्परगी बंधार्‍यातून व आलमट्टीतून विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे पाणी पुढे वाहून गेल्याने पूरस्थिती होणार नाही, अशाप्रकारचे व्यवस्थापन कर्नाटक जलसंपदा व पाटबंधारे खात्याकडून केले जात आहे. त्यामुळे हिप्परगी बंधार्‍यातून पाण्याचा विसर्ग वाढवून तो 1 लाख 61 हजार क्युसेक करण्यात आला आहे.         

तालुक्यातील पावसाचे प्रमाण  

चिकोडी- 29.0 मिमी, अंकली-32.4 मिमी, नागरमुन्नोळी-5.4 मिमी, सदलगा-44.0 मिमी, गळतगा-40.2 मिमी, जोडट्टी-8.6 मिमी, निपाणी पीडब्ल्यूडी-42.6 मिमी, निपाणी एआरएस- 47.6 मिमी, सौंदलगा- 50.2  मिमी.

प्रांताधिकारी, तहसीलदारांची नदीकाठाला भेट 

चिकोडी तालुक्यासह रायबाग तालुक्यातील नदीकाठावरील संभाव्य पूरसदृश स्थितीची पाहणी चिकोडी प्रांताधिकारी गीता कौलगी व तहसीलदार चिदंबर कुलकर्णी यांनी केली. त्यांनी कृष्णा, दूधगंगा व वेदगंगा नदी काठावरील बोरगांव-सदलगा, जत्राट-ममदापूर बंधार्‍यासह कुडची पुलाला भेट दिली. यावेळी नदीकाठावरील ग्रामस्थांना सतर्क राहण्याची सूचना केल्या.