Mon, Mar 25, 2019 13:13होमपेज › Belgaon › बारावी निकाल: बेळगाव, चिकोडीची घसरण

बारावी निकाल: बेळगाव, चिकोडीची घसरण

Published On: May 01 2018 1:15AM | Last Updated: May 01 2018 1:09AMबेळगाव: प्रतिनिधी

बारावी निकालात यंदा बेळगाव आणि चिक्कोडी या दोन्ही शैक्षणिक जिल्ह्यांची घसरण झाली आहे. बेळगाव जिल्हा 25 वरून 29 व्या स्थानी घसरला आहे. तर चिकोडी जिल्हा तिसर्‍या स्थानावरून चक्क तळाशी म्हणजे 34 व्या स्थानी पोहोचला आहे. दरम्यान, राज्याच्या एकूण निकाल 59 टक्के असून, त्यातही मुलींनीच बाजी मारली आहे.

बारावीचा निकाल सोमवारी सकाळी 11 पासून वेबसाईटवर जाहीर झाला. तो निकाल मोबाईलवर पाहण्यात विद्यार्थी दंग होते. मंगळवार 1 मे रोजी कॉलेजमध्ये निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
राज्याचा निकाल 59.56 टक्के लागला असून विद्यार्थिनींचे उत्तीर्ण प्रमाण 64.11 टक्के तर, विद्यार्थ्यांचे 52.30 टक्के आहे. राज्यात मंगळूर जिल्हा प्रथम स्थानावर (91.49 टक्के), उडपी (90.67 टक्के) द्वितीय, कोडगु (83.94 टक्के)  तिसर्‍या स्थानी आहे. परीक्षेला बसलेल्या 6 लाख, 85 हजार 713 विद्यार्थ्यांपैकी 4 लाख, 8 हजार 421 विद्यार्थी उत्तीणर्र् झाले आहेत.
गतवर्षाच्या तुलनेत यंदाच्या निकालात 7  टक्क्यांनी वाढ झाली आहे.        

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात केवळ 54.28 टक्के  विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

चिकोडी जिल्हा पिछाडीवर
चार वर्षापूर्वी चिकोडी शैक्षणिक जिल्हा पहिल्या क्रमांकावर होता. तो दोन वर्षापूर्वी तिसर्‍या क्रमांकावर आला. यंदा जिल्हा 52.2 टक्के निकालासह  शेवटच्या 34 व्या स्थानी आहे.
श्रेणी
उच्च श्रेणीमध्ये 54, 692 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या विद्यार्थ्यांनी 85 टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत. 60 टक्के ते 85 टक्के गुण मिळवणार्‍यांची संख्या 2, 13, 611  तर 60 टक्क्यांहून कमी गुणधारकांची संख्या 82, 532  आहे.
शून्य टक्के निकाल

25 सरकारी  महाविद्यालये, 2 अनुदानित महाविद्यालये  व 41 विनाअनुदानित अशा एकूण 68 महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के लागला असून या महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्यासाठी  माध्यमिक शिक्षण मंडळाकडे  शिफारस करण्यात आली असल्याची माहिती पदवीपूर्व शिक्षण खात्याच्या संचालिका पी.शिखा यानी दिली.

कला शाखेत सर्वाधिक गुण स्वाती कोट्ठुरू  595 गुण, रमेश 593 गुण व काव्यांजली गोरवर 588 गुण मिळवून अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळविले आहेत. हे तिघेही बळ्ळारी जिल्ह्याच्या कोट्टूर येथील हिंदू महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत.

फेरतपासणी

उत्तरपत्रिका फेरतपासणीसाठी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख 14 मे आहे. प्रत्येक विषयासाठी 1670 शुल्क आहे. शुल्क भरण्यासाठी 15 मे अखेरची मुदत असेल. उत्तरपत्रिकेची स्कॅनिंग प्रत मिळविण्यासाठी  प्रत्येक विषयाला रु.530 शुल्क असेल. पुरवणी परीक्षा 8 ते 20 जूनपर्यंत होईल, अशी माहिती    संचालिका शिखा यानी दिली.