Sat, Jul 20, 2019 13:36होमपेज › Belgaon › रिसॉर्ट, फार्महाऊस बनले गुन्हेगारांचे अड्डे

रिसॉर्ट, फार्महाऊस बनले गुन्हेगारांचे अड्डे

Published On: Aug 22 2018 12:54AM | Last Updated: Aug 21 2018 8:49PMखानापूर : वार्ताहर

दुर्गम आणि दुर्लक्षित खानापूर तालुक्याच्या निर्जन भागात रिसॉर्ट आणि फार्महाऊस मोठ्या संख्येने आहेत. प्रायव्हसी आणि प्रायव्हेट प्रॉपर्टीच्या नावाखाली याठिकाणी अवैध धंदे चालत असल्याची चर्चा स्थानिक नागरिकांतून होत आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारांचे हे अड्डे बनले आहेत. नुकताच चिखले येथील रिसॉर्ट मालकाला पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी ताब्यात घेतल्यानंतर या रिसॉर्ट आणि फार्महाऊसचे भयाण रूप समोर आले.

अलिकडे तालुक्यात रिसॉर्ट आणि फार्महाऊ संस्कृती झपाट्याने वाढत चालली आहे.   खास करुन पश्‍चिम घाटात धनदांडग्यांनी जमिनी घेऊन तेथे फार्महाऊस बांधले आहेत. मात्र अलिकडे त्याआडून अवैध धंदे तसेच अनैतिक प्रकार घडत आहेत. ‘प्रायव्हेट प्रॉपर्टी’, ‘आत येण्यास सक्त मनाई आहे’ असे लिहिलेले फलक लावून अवैध उद्योग चालतो. नेहमी या परिसरात संशयास्पद हालचाली सुरु  असतात, अशी माहिती स्थानिकांकडून मिळाली . 

जांबोटी, कणकुंबी, चोर्ला घाट, पारवाड, लोंढा, रामनगर, नेरसा, हेम्मडगा आणि गोव्याच्या हद्दीत  मोठ्या प्रमाणात फार्महाऊस आणि हॉटेल-रिसॉर्ट आहेत. बेळगाव आणि परिसरातील लोकांचा नेहमी या परिसरात मोठा वावर असतो. याआधी निसर्गप्रेमीच येथे निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येत असलेले दिसत होते. मात्र अलिकडे या फार्महाऊस आणि रिसॉर्ट परिसरात नशेमध्ये धुंद असलेले युवक दिसून येतात. रात्री अपरात्री होणार्‍या संशयास्पद हालचाली सुरु असल्याचेही निदर्शनास येते. मात्र रात्री अपरात्री येथे गाड्या थांबलेल्या दिसतात. यातील जादा तर फार्महाऊस बेळगाव परिसरातील उद्योजकांचे, निवृत्त शासकीय अधिकार्‍यांचे तसेच राजकीय नेत्यांचे असल्याने त्या परिसरात सामान्य नागरिक, गुराखी जाण्याचे टाळतात. संबंधित ग्राम पंचायतही घाबरुन कोणतीच कारवाई करत नाही. यामुळे अशा ठिकाणी राजरोस अनैतिक धंदे सुरू आहेत. 

तालुका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष चालविले असल्याने  निसर्गसंपदेने नटलेला आणि सांस्कृतिक वारसा जपणार्‍या तालुक्यात अवैध धंदे, गुन्हेगारी वाढल्याने याची मोठी झळ तालुकावासियांना सोसावी लागणार आहे.  अशा संशयास्पद ठिकाणांवर नजर ठेवून कारवाई करण्याची नितांत गरज आहे.