Wed, Apr 24, 2019 07:46होमपेज › Belgaon › मराठी कागदपत्रांसाठीचा ठराव ता.पं.मध्ये अखेर संमत 

मराठी कागदपत्रांसाठीचा ठराव ता.पं.मध्ये अखेर संमत 

Published On: Mar 21 2018 1:41AM | Last Updated: Mar 20 2018 11:47PMबेळगाव : प्रतिनिधी

गेल्या तीन वर्षापासून ता.पं.च्या प्रत्येक सर्वसाधारण बैठकीत मराठी कागदपत्रांसाठी मागणी करणार्‍या सदस्यांना अखेर न्याय मिळाला आहे. ता. पं. च्या सर्वसाधारण बैठकीत मराठी कागदपत्रे देण्याचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला आहे. 

ता. पं. अध्यक्ष शंकरगौडा पाटील यांनी सदर मागणीची दखल घेत त्याची पूर्तता करण्याची आश्‍वासन बैठकीत दिले. ता. पं. कार्यालयात झालेल्या सर्वसाधारण बैठकीच्या अध्यक्षस्थानी ता. पं. अध्यक्ष शंकरगौडा पाटील होते. उपाध्यक्ष मारूती सनदी, कार्यकारी अधिकारी एस. के. पाटील होते. बैठकीमध्ये नेहमीप्रमाणे यावेळीही म. ए. समितीच्या मराठी ता. पं. सदस्यांनी मराठी कागदपत्रांचा मुद्दा उपस्थित केला. 

ता.पं.सदस्य सुनिल अष्टेकर म्हणाले, सीमाभागातील मराठी कागदपत्रांसाठी मागणी करत आहे. न्यायालयाने आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी केली जात नाही. हा न्यायालयाचा अवमान आहे.  
ता.पं,सदस्य नारायण नलवडे, रावजी पाटील, नारायण कदम, काशिनाथ धर्मोजी, आप्पासाहेब कीर्तने, निरा काकतकर, रेणूका सुळगेकर आदी सदस्यांनीही या मुद्यावर आवाज उठविला. 

त्याचवेळी अध्यक्ष शंकरगौडा पाटील यांनी कार्यकारी अधिकारी एस. के. पाटील यांना सूचना करून मराठी सदस्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याची सूचना केली. पुढील बैठकीत मराठीमध्ये बैठकीचे इतीवृत्त तसेच इतर कागदपत्रे मराठीमध्ये देण्यात येतील. याबरोबरच ता. पं. कार्यालयातील सदस्यांचा नामफलकही मराठी व कन्नड अशा दोन्ही भाषेत लावण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

ता. पं. सभागृह अस्तित्वात आल्यानंतर सत्तेपासून दूर ठेवण्यात आलेल्या म. ए. समिती सदस्यांनी विरोधी पक्षाची भूमिका समर्थपणे पेलली आहे. यााधी झालेल्या सर्वच सर्वसाधारण बैठकांमध्ये  मराठी कागदपत्रांचा मुद्दा उपस्थित करून मराठी अस्मिता जागृत ठेवली आहे. सभागृहातील कन्नडधार्जिन्या सदस्यांसह अध्यक्षांकडूनही नेहमीच मराठी सदस्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले होते. मात्र निधी वितरणाच्या मुद्यावरून विरोधक  व सत्ताधारी गटातील सदस्यांनी एकत्र येऊन दोन बैठका उधळून लावल्या होत्या. अध्यक्षांनी बोलाविलेल्या बैठकांकडे पाठ फिरवल्याने अध्यक्षांची चांगलीच गच्छंती झाली होती. अखेर सदस्यांच्या  मागण्या लक्षात घेऊन अध्यक्ष शंकरगौडा पाटील यांना नमते घ्यावे लागले आहे. यामुळेच मराठी कागदपत्रांसाठी लढा देणार्‍या मराठी सदस्यांची मागणी अखेर अध्यक्षांना मान्य करावी लागली.