Wed, Jul 17, 2019 00:26होमपेज › Belgaon › दुकानदारांकडून शिधापत्रिकाधारकांची लूट!

दुकानदारांकडून शिधापत्रिकाधारकांची लूट!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

गरीब आणि गरजू लोकांना धान्य पुरवठा करण्यासाठी सरकारने अन्न आणि नागरी पुरवठा खात्याच्यावतीने शिधापत्रिकाद्वारे धान्य देण्यात येते.  यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असून नागरिकांची फसवणूक करण्यात येते. नियम धाब्यावर बसवून शिधापत्रिकाधारकांची लूट करण्यात येते. प्रशासन आणि दुकानदार यांचे साटेलोटे असल्यामुळे त्यांच्यावर कारवाईस टाळाटाळ केली जात आहे.

राज्यातील एकही नागरिक भुकेला राहू नये, यासाठी अन्नभाग्य योजना सुरू केली. यामुळे प्रत्येक शिधापत्रिकेला कुटुंबातील सदस्य संख्येनुसार धान्य वितरण करण्यात येते. यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी प्रशासनाने अनेक उपाययोजना आखल्या आहेत. याला फाटा देऊन सामान्य नागरिकांची लूट सर्वच ठिकाणी सुरू आहे.

बहुतांश दुकानदारांकडून बिल देण्याचे टाळले जाते. दिलेले बिल पुन्हा घेऊन फाडून टाकण्याचे प्रकार होत आहेत. पावतीवर दर नोंदविण्यात येत नाही. शिधापत्रिकाधारकाकडून मनमानी पैसे वसूल करण्यात येतात. ग्राहकांची आर्थिक लूट पद्धतशीरपणे करण्यात येते.

शिधापत्रिकेवरील धान्य प्रामुख्याने गरीब आणि गरजू नागरिकांकडून नेण्यात येते. मात्र, त्यांच्या तोंडचा घास लंपास करण्याचा प्रकार दुकानदाराकडून सुरू आहे. सध्या अन्न आणि नागरी पुरवठा खात्याकडून प्रत्येक दुकानदाराकडे इलेक्ट्रॉनिक वजनकाट्याची सक्ती करण्यात आली आहे. यामुळे दुकानदारांना फसवणूक करताना अडचण येत आहे. असे असले तरी काही जणांनी यामध्येही पळवाटा शोधल्या असून मापात पाप करण्याचे धंदे राजरोस सुरू आहेत.

दरफलक गायब

प्रत्येक दुकानाच्या दर्शनी भागात दरफलक व धान्याचा नमुना ग्राहकांसाठी ठेवणे आवश्यक असते. अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचा तसा दंडक आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असून अपवाद वगळता सर्रास दुकानांतून नमुना धान्य आणि धान्य दरपत्रक गायब झाल्याचे दिसून येते.\

अन्नभाग्यचा तांदूळ बाजारात

अन्नभाग्य योजनेतून नागरिकांना तांदूळ पुरवठा केला जातो. हा तांदूळ दुकानदाराकडून लंपास करण्यात येतो. या प्रकारचे तांदूळ पोलिसांनी अनेकवेळा पकडले आहेत. यामध्ये दुकानदार आणि खात्याच्या अधिकार्‍यांची साखळी असते. यातून हा प्रकार सुरू असून नजीकच्या कोल्हापूर जिल्ह्यातही हा तांदूळ विकण्यात येतो. अशा दुकानदारांवर कठोर कारवाईची आवश्यकता आहे.


  •